झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून धुवून घेतले पाय
गुरुपौर्णिमा महोत्सवातील प्रकार, व्हिडीओ झाला व्हायरल
जमशेदपूर: झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात महिलांकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री दास एका मोठय़ा ताटात उभे राहिलेले व्हायरल व्हिडिओत दिसत असून जमिनीवर बसून दोन महिला त्यांचे पाय धुवत आहेत. गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी या महिला मुख्यमंत्र्यांच्या पायावर टाकत पाय धुवत असल्याचे दिसत आहे. जमशेदपूरच्या ब्रह्म लोकधाम येथे आयोजित कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. गुरु महोत्सवानिमित्त या कार्यक्रमात ६२ वर्षीय मुख्यमंत्री रघुबर दास यांचे प्रमुख पाहुणे म्हणून अशा स्वरुपात स्वागत करण्यात आले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधीपक्षांनी मुख्यमंत्री दास यांच्यावर टीका करीत त्यांनी महिलांचा अपमान केल्याचे म्हटले आहे.
बंगळूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वृंदा अडिगे यांनी या प्रकरणी खरमरित प्रतिक्रिया दिली असून, असे प्रकार कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. दास यांना अशा घटनेनंतर मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जेंव्हा पाय धुण्याची वेळ येते तेव्हा केवळ महिलांकडूनच या गोष्टी का करवून घेतल्या जातात असे मत काँग्रेस नेते रंजित रंजन यांनी व्यक्त केले आहे.