नववी दहावीची तोंडी परीक्षा बंद

तोंडी परीक्षेतील गुणांची खिरापत होणार रद्द

0

मुंबई: नववी, दहावीच्या भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाषा विषयांचा 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा हा पॅटर्न बदलण्यात आला असून यापुढे विद्यार्थ्यांना 100 गुणांची प्रश्‍नपत्रिका सोडवावी लागणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात नववीसाठी तर 2018 -19 या वर्षापासून दहावीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील परिपत्रक राज्य मंडळाने जारी केले आहे.

तोंडी परीक्षांचे गुण शाळांच्या हातात असल्याने दहावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत होते. निकाल वाढवण्यासाठी अनेक शाळा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण देत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांची भाषा विषय गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 80:20 हा पेपर पॅटर्न बदलण्यासंदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षण संचालनालय आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रक जारी केले असून यात भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

कसा असणार नवीन पॅटर्न ?

संपूर्ण भाषा विषयांसाठी 100 गुणांची तर, संयुक्त भाषा विषयांसाठी प्रत्येकी 50 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. गणित हा 100 गुणांचा विषय. यातील 80 गुण लेखी आणि 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. 80 गुणांमध्ये 40 गुण बीजगणित आणि 40 गुण भूमितीसाठी असतील. विज्ञान-तंत्रज्ञान विषयाची 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. 80 गुणांमध्ये भाग 1 व भाग 2 प्रत्येकी 40 गुणांचा असेल. सामाजिकशास्त्रे या विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल मिळून 100 गुण. इतिहास 40, राज्यशास्त्र 20 व भूगोल 40 अशी गुणांची विभागणी असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.