खा. उदयनराजे भोसले यांना अखेर अटक

खंडणी आणि धमकावल्याचा आरोप

0

सातारा: साता-याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले मंगळवारी (25 जुलै) सकाळी स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून ते पोलिसांना हवे होते. त्यांच्यावर खंडणीचा आणि धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ते अखेर स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

ज्यावेळी उदयनराजे भोसले पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते, त्यावेळी दोन पोलीस कॉन्स्टेबलव्यतिरिक्त दुसरे कुणीही तेथे हजर नव्हते. त्यामुळे उदयनराजे स्टेशनबाहेर निघाले व थोड्या वेळाने पुन्हा तेथे आले. अचानक उदयनराजे पोलिसांसमोर आल्याने थोडासा गोंधळ उडाला होता.

त्यांच्या विरोधात खंडणी व हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ते साताऱ्याबाहेर होते. लोणंद येथील सोना अलाइन्ज कंपनीच्या मालकाची हत्या करण्याचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजेंनी सुरुवातीला सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

तो नामंजूर झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. तेथेही हा अर्ज फेटाळला गेल्यानंतर पोलीस यंत्रणेची हालचाल सुरू झाली.दरम्यान, तब्बल 100 दिवसांनंतर उदयनराजे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले होते. ते आल्याचे समजताच गांधी मैदानाजवळ कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले होते.

शिवघराण्याच्या राजमाता कल्पनाराजे व इतर सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. हे समजताच पोलीस खात्याने शहर पोलीस ठाण्याभोवती कडक पोलीस बंदोबस्त ठेवला.

दरम्यान, उदयनराजेंना अटक झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सातारा बंद केले. बाजारपेठाही बंद करण्यात आल्या. तसेच शाळा- महाविद्यालयांनाही सुट्ट्या देण्यात आल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचं सुत्रांनी सांगितलं.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.