मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अचानक रवी शास्त्री यांनी या स्पर्धेत बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे वीरेंद्र सेहवागचं नाव प्रशिक्षकपदावरून मागे पडलं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, रवी शास्त्री आणि टॉम मूडी यांच्यानंतर वीरुने सर्वात चांगलं प्रझेंटेशन दिलं होतं. अर्थात वीरुने मुलाखतीची संपूर्ण तयारी केली होती. आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटॉर म्हणून अनुभव असल्यामुळे वीरुला प्रशिक्षक म्हणूनही अनुभव होताच. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा सल्ला वीरुला दिला. त्यानंतर वीरुने पूर्ण आत्मविश्वासाने अर्ज केला.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनंतर अर्ज करण्यापूर्वी वीरुने कोहलीशी चर्चा करणं योग्य समजलं. क्रिकेटमध्ये तुमचं योगदान मोठं आहे. त्यामुळे तुम्ही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याने मला काहीही अडचण नाही. भारतीय क्रिकेटसाठी चांगलं योगदान देऊ शकतो, असं वाटणारा प्रत्येक जण या पदासाठी अर्ज करु शकतो, असं कोहलीने वीरुला सांगितलं.
तुमच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि तुम्ही प्रशिक्षक म्हणून उत्तम काम कराल, याची मला खात्री आहे. पण यासाठी एक प्रोफेशनल सेटअप आहे. त्यामुळे थोडं अवघड काम आहे आणि सर्व निर्णय सीएसीच्या हातात आहे, असंही विराटने वीरुला सांगितलं.
संघासोबत असलेला सपोर्ट स्टाफ अनेक दिवसांपासूनचा आहे. त्यामुळे त्यांना संघातील प्रत्येक सदस्याच्या गरजा माहित आहेत, असंही विराट म्हणाला आणि याच मुद्द्यावर रवी शास्त्रींनी वीरुवर मात केली. कर्णधार आणि संघाच्या गरजांसाठी विस्तृत दृष्टीकोन तयार करण्यासाठी रवी शास्त्री तयार होते. संघासोबत गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरचं महत्व ओळखत असल्याचं रवी शास्त्रींनी मान्य केलं आणि याचाच त्यांना फायदा झाला.