पुरामुळे आरोग्यधाम हॉस्पिटलचे कोट्यवधींचे नुकसान

बहुगुणी डेस्क, दिग्रस: शनिवारी परिसरात आलेल्या मुसळधार पावसामुळे आरोग्यधाम हॉस्पिटलचे कोट्यवधींचे नुकसान झाले. रुग्णालयात दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने विविध मशिनरीत पाणी शिरून या मशिन खराब झाल्या. परिणामी दोन दिवस रुग्णसेवा देखील प्रभावित झाली होती. हॉस्पिटल प्रशासनाने वेळीच परिस्थिती योग्यरित्या हाताळल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा रुग्णांचे कोणतेही नुकसान झाले नाही. सध्या रुग्णालयातील परिस्थिती पूर्ववत झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. शनिवारी चिंचोली गावाकडून पाण्याचा मोठा प्रवाह हॉस्पिटलच्या आत आला. त्यामुळे हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये पाणी शिरले. अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ इथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने व कर्मचा-यांनी वेळीच परिस्थिती हाताळली. त्यामुळे कोणत्याही रुग्णाचे नुकसान झाले नाही. मात्र यात हॉस्पिटलचे सुमारे 1.25 कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनेक कागदपत्र नष्ट झाले आहे. 

आरोग्यधाम हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरला मेडिकल स्टोअर्स, महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेचे कार्यालय, पंचकर्म विभाग, सिटीस्कॅन मशीन, एक्सरे मशीन, पॅथॉलॉजी विभाग, प्रशासकीय कार्यालय, अपघात विभाग, मायनर ओ.टी, तसेच हॉस्पिटलचे सेंट्रल स्टोअर इत्यादी विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये दीड ते दोन फूट पाणी साचले होते. दरम्यानच्या काळात लाईट नसल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती पूर्ववत झाल्याने रुग्णसेवा सुरू झाली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Comments are closed.