मानोरा: महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र यावा, विचारांची देवाण घेवाण व्हावी, समाज प्रबोधन घडून यावं हा त्यामागचा उद्देश होता. जसजसा काळ पुढे गेला हा उत्सव भव्य स्वरुपात साजरा कसा करावा याची चढाओढ निर्माण झाली. पारंपरिकी ढोलताश्याची जागा डॉल्बी साउंडने घेतली. आज उत्सवाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या प्रदूषणाद्वारे पर्यावरणाला धोका पोहोचवला जातो.
उत्सव हा जोमातच आणि धडाक्यात साजरा झाला पाहिजे मात्र त्यात कोणत्याही प्रकारचे पर्यावरणाचे नुकसान व्हायला नको. त्यासाठी आपण गुलालमुक्त व डीजे मुक्त गणेश विसर्जन करावे अशी आपणास विनंती आहे. त्याऐवजी पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल पथकांचा जास्त प्रमाणात समावेश करावा, पारंपरिक मर्दानी खेळ, लेझीम पथक इत्यादींचा समावेश करावा अशी विनंती पत्रक काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केली आहे.