शेतक-यांच्या भव्य मोर्चाने दणाणले मानोरा

विविध मागण्यांसाठी शेतक-यांचा एल्गार

0

मानोरा: विविध प्रलंबित मागणीसाठी बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी शेतक-यांनी मानोरा येथे भव्य मोर्चा काढला. पंचायत समिती पासून या मोर्चाला सुरूवात झाली तहसिल कार्यालय असा हा मोर्चा निघाला. शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत दिग्रस चौक मार्गे हा मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. शेतकरी नेते मनीष राठोड, डॉ. श्याम जाधव (नाईक) रमेश महाराज, संजय महाराज, मनोहर राठोड यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती होती.

सन 2016-17 चे रामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमधले सोयाबिन वरील 200 रुपये अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. हे अनुदान त्वरीत द्यावे. दुष्काळग्रस्त उमरी मंडळाच्या शेतक-यांचे अनुदान त्वरित द्यावे. किसान सन्मान योजनेमध्ये होणारी शेतक-यांची हळसांड थांबवून त्यांना लवकरात लवकर कर्ज द्यावे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, चिखली धरणाची व्याप्ती वाढवून मानोरा तालुक्यातील सर्व धरणांचे पुनर्जीवन करावे तसेच मंगरुळपीर तालुक्यातील चिखली शेलुबाजार येथील शेतक-यांवर बैलांच्या शर्यती प्रकरणी लावण्यात आलेले गुन्हे परत घ्यावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.

दुपारी 12 वाजताच्या सुमारास पंचायत समिती पासून मोर्चाला सुरूवात झाली.शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण केल्यानंतर तहसिल कार्यालयावर मोर्चाचा शेवट झाला. इथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी बोलताना शेतकरी नेते मनीष राठोड म्हणाले की….

सरकार धनदांडग्यां उद्योगपतींना सवलती देते. त्यांचे कर्ज माफ करते. मात्र जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतक-यांकडे दुर्लक्ष करते.  आज प्रत्येक गोष्टीमध्ये शेतक-यांची लूट केली जात आहे. पीक विम्याच्या नावाखाली त्याच्या अकाउंटमधून विम्याचा हफ्ता कपात जात आहे. मात्र तिथे उंबरठा उत्पन्नाची जाचक असे नियम व अटी लावून त्याला पैसे कसे मिळणार नाही याचीही सोय केली आहे.

डॉ. श्याम जाधव (नाईक) म्हणाले की…

परिसराला वसंतराव नाईकांसारख्या शेतक-यांसाठी अख्ख आयुष्य वेचणा-या नेत्या वारसा लाभला आहे. मात्र त्यांच्या परिसरातच खुद्द शेतक-यांनाच आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढण्याची वेळ येत आहे. आजच्या काळात दोनशे रुपये ही काही मोठी रक्कम नाही. मात्र त्याचे मोल हे शेतक-याला आहे. त्याने घाम गाळून पिकवलेल्या मालाचे ते पैसे आहे. जसे अंबाणी अदाणी, पतंजलीला सरकार खैरात वाटते तशी ती खैरात नाही. त्यामुळे केवळ अंगमेहनतीच्या दोनशे रुपयांसाठी शेतक-यांना रस्त्यावर यावे लागते यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट होऊ शकत नाही. 

यावेळी रमेश महाराज, मनोहर राठोड यांनी ही मनोगत व्यक्त केले. सभेनंतर तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आणखी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. मोर्चाच्या यशस्वितेसाठी जगदीश जाधव,सुनील जाधव,युवराज जाधव,व अनेक शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.