कविता आणि ग्रंथवाचकांच्या चर्चेने साजरा झाला अशोक महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन

मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन आणि 'जगू कविता : बघू कविता कार्यक्रम' चांदूर रेल्वेत

0 382

बहुगुणी डेस्क, चांदूर रेल्वेः स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी झालं. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे होते. महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि ग्रंथालयाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं. विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभावती विहिरे आणि प्रा. सुषमा मावंदे यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं.

मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन करताना कवी सुनील इंदुवावमन ठाकरे, प्राचार्य कारमोरे, प्रा. सुषमा मावंदे

कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम विद्यार्थी आणि उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांनी संतकवींपासून तर अगदी अलीकडच्या अनेक कवीचे दाखले दिलेत. जगण्यातलं सहज-सोपं तत्त्वज्ञान कवींनी कसं मांडलं यावर त्यांनी चर्चा केली. संत तुकाराम महाराजांनी विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना आपल्या अभंगातून काय काय दिलं हेदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

ग्रंथावर भाष्य करताना विद्यार्थी

गालीब, ग्रेस, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, प्रा. अशोक थोरात, नारायण सुर्वे आदींच्या कवितांमधील जगणं त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडलं. वाचनप्रेरणादिनाच्या अनुषंगाने त्यांनी माहिती आणि ज्ञान यातील फरक स्पष्ट केला. आपल्याजवळ असलेल्या चांगल्या माहितीचा, वाचनाचा आयुष्यात प्रत्यक्ष उपयोग करण्यावर त्यांनी भर दिला. वाचनातून जगण्याची दिशा आणि प्रेरणा मिळते असंही ते यावेळी म्हणालेत.

अशोक महाविद्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित स्टाफ

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य कारेमोरे यांनी वाचनसंस्कृतीवर चर्चा केली. जगण्याचं कौशल्य हे संतसाहित्यातून मिळवता येतं असंही ते यावेळी म्हणालेत. सुनील इंदुवामन ठाकरे यांच्या ‘जगू कविता: बघू कविता’ या कार्यक्रमावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. अनेक कवींनी आपल्याला जगण्यातले पैलू कसे सांगितले त्यावर भाष्य केलं. वाचनप्रेरणादिनानिमित्त बोलताना ते म्हणालेत की, आपण काय वाचतो ते महत्त्वाचं आहे. भविष्याला आकार देणारं साहित्य विद्यार्थ्यांनी वाचावं. त्याचा उपयोग सर्वांच्या हितासाठी करावा असंही ते म्हणालेत.

भूमिका मांडताना प्रा. सुषमा मावंदे

प्रास्ताविक भाषणातून डॉ. प्रभावती विहिरे यांनी साहित्यातून होणारे संस्कार स्पष्ट केलेत. साहित्यामुळे माणसाला माणूसपण मिळतं असंही त्या यावेळी म्हणाल्यात. या दिनानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या ‘बूक-टॉक’ या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. अश्विनी गोमासे, प्रणाली वासनिक, पायल कांबळे, पूजा कडू, प्राजक्ता वासनिक, योगेश आंबटकर, कुणाल घरडे, वैष्णवी नलगे, खुशी रायकवार आणि साक्षी कोठेकर यांनी त्यांनी वाचलेल्या ग्रंथावर भाष्य केलं. संचालन प्रा. सुषमा मावंदे यांनी केलं. आभार नागेश काळमेघ या विद्यार्थ्याने मानलेत.

अधीक्षक अजानन केकाडे, प्रा. शिल्पा शिंदे, प्रा. भैरवी मेश्राम, प्रा. प्रियंका तिजारे, प्रा. माया वानखडे, प्रा. मीनाक्षी भांदककर, प्रा. रॉय, राजेंद्र किन्हेकर, शिक्षक आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुधीरभाऊ शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साक्षी मोरे, काजल येसने, पूजा मेटे, अर्पिता तायडे, अनिकेत हरणे, वैभव अमरी आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.

Comments
Loading...