नागेश रायपुरे, मारेगाव: गुरुवारी 6 रुग्ण आढळल्यानंतर आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी तालुक्यात 12 रुग्ण आढळले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये मारेगाव शहरातील 5 तर ग्रामीण भागातील 7 रुग्ण आहेत. कोरोनाने मार्डी, कोलगाव, पिसगाव, बोटोणी येथे शिरकाव केला आहे. तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 26 झाली आहे.
आज मारेगावात आलेल्या रुग्णांमधले 5 ही रुग्ण हे माधवनगरी येथील आहेत. हे आलेले रुग्ण हे वणीतून मारेगाव येथे येणा-या कृषी केंद्र चालकाच्या व एका शासकीय कर्मचा-याच्या संपर्कात आलेले आहे. यात हार्डवेअर दुकानातील कर्मचारी व त्याच्या शेजारी असलेल्या एका पानटपरी चालकाचा समावेश आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर
आज ग्रामीण भागात 7 रुग्ण आढळून आले आहेत. मार्डी व कोलगाव येथे प्रत्येकी 2, तर पिसगाव, बोटोणी व नवरगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. प्रशासनाने रुग्ण आढळलेला परिसर सिल करण्यास सुरूवात केली असून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करण्याचे काम सध्या सुरू आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे.
सर्वात आधी मारे 25 जुलै रोजी तालुक्यात वणी तालुक्यातील राजूर येथील पॉजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येऊन कुंभा येथील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर कोरोनाची साखळी खंडीत झाली होती. मात्र त्यानंतर दीड महिन्यानी अचानक 3 सप्टेंबर रोजी मारेगाव येथील पंचायत समितीतील एक कर्मचारी व 5 सप्टेंबर रोजी सिंदी (महागाव) येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली. तिथून कोरोनाची साखळी वाढण्यास सुरूवात झाली.
10 सप्टेंबरला 6 रुग्ण तर 11 सप्टेंबरला 5 रुग्ण आढळून आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 26 झाली असून त्यातील कुंभा येथील एक व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाली आहे. त्यामुळे तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग बघून प्रशासनाने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.