कोरोनाचा हाहाकार… आज 41 पॉजिटिव्ह तर दोघांचा मृत्यू….

आज रुग्णसंख्येचा नवीन रेकॉर्ड, रुग्णसंख्येने पार केला 400 चा आकडा

0

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी कोरोनाने हाहाकार माजवला. रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 41 रुग्ण आढळलेत तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. याशिवाय आज कोरोनाने रुग्णसंख्येचा 400 चा पल्ला पार केला. आज आलेल्या रुग्णांपैकी 36 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार तर 5 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 418 झाली आहे. दरम्यान आज कोरोनाविषयक इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शहरातील लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचे जिल्हाधिका-यांनी आदेश दिले. तसेच आज विनामास्क फिरणा-या 50 पेक्षा अधिक व्यक्तींवर पोलिसांनी कार्यवाही केली. शहरात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन आज जनता कर्फ्यूसंदर्भात कल्याण मंडपम येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आज यवतमाळहून 56 अहवाल प्राप्त झाले. यात 36 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 20 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 14 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 9 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 158 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 418 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 265 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 122 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 7 झाली आहे.

आज दोन रुग्णांचा मृत्यू
आज आलेल्या रुग्णांमध्ये राजूर येथे 7, रांगणा येथे 7, भालर 4, पळसोनी 1, मुर्दुनी 1, चिखलगाव 1, तर शहरात पंचशील नगर येथे सर्वाधिक 6, वसंत विहार येथे 3, सिंधी कॉलनी 2, जैन ले आऊट 2, विराणी टॉकिज परिसर 1, पद्मावती नगरी 1, देशमुखवाडी 1, प्रगती नगर 1, माळीपुरा 1, जिजामाता नगर 1 व इतर ठिकाणी 1 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय आज गणेशपूर येथील एका 52 वर्षीय व एका 85 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर राजूर येथील एका रुग्णांचा काल रात्री चंद्रपूर येथे मृत्यू झाला.

आज 15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 132 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 60 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 62 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 16 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 75 व्यक्ती भरती आहेत.

विनामास्क फिरणा-या 64 महाभागांवर कार्यवाही
जिल्हाधिकारी यांनी शनिवारी विनामास्क फिरणा-या व्यक्तींवर 500 रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र वणीकरांनी अद्यापही त्याची घेतली नाही. आज पोलीस विभागातर्फे वणीत 64 व्यक्तींवर कार्यवाही करण्यात आली. त्यांच्यावर 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जर हिच व्यक्ती पुन्हा विनामास्क फिरताना आढळली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान ठाणेदार वैभव जाधव यांनी विनामास्क फिरू नये असे आवाहन वणीकरांना केले आहे.

लोढा हॉस्पिटल होणार कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल
आज जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 7 हॉस्पिटलला डेडिकेटेड हॉस्पिटल करण्याचा आदेश दिला. यात वणीतील लोढा हॉस्पिटलचा समावेश आहे. आता परिसरातील रुग्णांचे निदान, उपचार व देखभाल या हॉस्पिटलमध्ये होणार आहे. लोढा हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल करण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नवीन डे़डिकेटेड कोविड हॉस्पिटल शहरात सुरू होणार असल्याने परिसरातील कोविड रुग्णांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे खासगी कोविड केअर सेंटरच्या प्रकरणावर देखील पडदा पडला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.