कार काढण्यावरून वाद, कार चालकाला हातोड्याने मारहाण

हातोड्याने फोडली कारची काच, टिळक नगर येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्यावरून कार काढण्यावरून दोन कार चालकात वाद झाला. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. एका कारमधल्या चौघांनी दुस-या कारमधल्या चालकाला हातोड्याने बेदम मारहाण करीत कारची काच फोडली. मारहाणीत कारचालक जखमी झाले आहेत. वणीतील जैताई मंदिर जवळील टिळक नगर परिसरात रविवारी रात्री 7.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीवरून मारहाण करणा-या चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी मनोज प्रभाकर ढुमे (52) हे टिळक नगर वणी येथील रहिवासी असून ते सध्या मुलांच्या शिक्षणानिमित्त नागपूर येथे राहतात. त्यांची कायर परिसरात शेती असल्याने ते वणीत नेहमी ये-जा करतात. रविवारी दिनांक 1 जून रोजी ते वणी येथे आले होते. दुपारी ते शेती पाहायला गेले होते. संध्याकाळी ते वणीत परत आले. संध्याकाळी पावने आठ वाजताच्या सुमारास ते जैताई मंदिर जवळील त्यांच्या भाच्याच्या घरी त्यांच्या फियाट या कारने जात होते.

दरम्यान त्यांच्या कारसमोर एक स्कॉर्पिओ कार (MH29 BV9798) आली. त्यांनी मनोज यांना अपर डिपर दिले. त्यामुळे त्यांनी कारचा काच खाली करून त्यांना साईड देऊन हाताने इशारा केला. दरम्यान स्कॉर्पिओ मधून 4 इसम बाहेर आले. ते मनोज यांच्या अंगावर धावून आलेत. त्यांनी शिविगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

एकाने गाडीतून हातोडा आणला व त्याने मनोज डोक्यावर मारण्यास उगारला. मात्र त्यांनी हात मध्ये टाकून वार चुकवला. त्यामुळे हातोडीचा दांडा त्याच्या हाताला लागला. झालेल्या मारहाणीत मनोज यांच्या गालावर हातोडीचा दांडा लागला. एकाने हातोडीने गाडीच्या काचावर प्रहार करीत गाडीची काच फोडली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन ते सर्व तिथून निघून गेले. या मारहाणीत मनोज जखमी झालेत. तसेच त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.

झालेल्या प्रकारानंतर त्यांनी घाबरून वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी उमेश राय व त्याच्या तीन साथिदारांविरोधात तक्रार दिली, पोलिसांनी आरोपींविरोधात बीएनएसच्या कलम 115 (2), 118 (1), 324 (4), 351 (2), 351 (3), 352 व 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

रात्री हळदीला जातो सांगून घरून निघाला, पहाटे आढळला मृत….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.