जितेंद्र कोठारी, वणी: रात्री गावी परत जायला गाडी नसल्याने बस स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना अज्ञात लुटारूंनी मारहाण करून लुटले. ही घटना सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादी रामदास बापूराव वाभीटकर, रा. कोरपना यांनी याबाबत वणी पोलिस ठाण्यात 2 अज्ञात इसमांविरुद्द तक्रार नोंदवली आहे.
रामदास वाभीटकर हे यवतमाळ येथील आपल्या भावाला भेटून कोरपना जाण्याकरिता रात्री 9 वाजता वणी बस स्थानकावर पोहचले. मात्र रात्री कोरपना जाण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी बस स्थानकावरच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कोलगाव ता. मारेगाव येथील संतोष पोफरे नामक प्रवासीही भद्रावती जाण्यासाठी बस स्थानकवरच थांबून होता.
रात्री 11.35 वाजता लाल रंगाच्या हिरोहोंडा कंपनीच्या मोटारसायकलवर दोन व्यक्ती तिथे आले. त्या दोघांनी संतोष पोफरे याचे हातपाय धरून त्याच्या खिशातून बळजबरीने 500 रुपये काढले. त्यानंतर दोन्ही लुटारूनी रामदास वाभीटकर याला मारहाण करुन पॅन्ट व शर्टाच्या खिशात असलेले 700 रुपये बळजबरीने काढून पळून गेले.
घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी रामदास बापूराव वाभीटकर (41), रा. साईबाबा मंदिर जवळ, कोरपना, जि. चंद्रपूर यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस अधिकारी सपोनि पिंगळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी बस स्थानक गाठून शोध घेतले असता आरोपी मिळून आले नाही.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 392, 34 भादवी अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय गोपाल जाधव करीत आहे. दरम्यान सागर उर्फ गोलू मोहन पुसाटे (25) रा. वणी व अनिकेत दादाराव कुमरे (19) रा. सिंधी मारेगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हे देखील वाचा: