बंदुकीच्या धाकावर रेतीघाट धारकाला 5 लाखांच्या खंडणीची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: रेतीघाट चालवायचा असेल तर 5 लाख रुपये खंडणी आणि 2 लाख रुपये दर महिन्याला हप्ता द्या अशी मागणी करीत रेतीघाट धारकाच्या डोक्यावर बंदूक लावून खंडणी व हप्ता मागण्याची खळबळजनक प्रकार मारेगाव तालुक्यातील कोसारा रेती घाटावर घडला. बुधवारी दिनांक 13 सप्टे. रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी रेतीघाट धारकाने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री तक्रार दिली. त्यावरून मारेगाव पोलिसांनी स्था. गुन्हा शाखा अधिकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ कार्यवाही करत आज सकाळी आरोपीला यवतमाळ येथून अटक केली. लल्ला उर्फ ललित गजभिये, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी यवतमाळ असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी सैय्यद मन्सूर सैय्यद दाउद (34) रा. डेहनकर लेऑउट, भोसा, यवतमाळ हे यवतमाळ परिसरात बिलाल ट्रेडर्स या नावाने ठेकेदारी व्यवसाय करतात. मारेगाव तालुक्यातील कोसारा रेतीघाटाचे सन 2022-23 करिता रेती उपशाचा टेंडर त्यांनी घेतला आहे. तिथे त्यांचे शासकीय नियमानुसार रेती उपसा सुरु आहे.

दिनांक 30 ऑगस्ट रोजी सैयद मन्सर यांचे सहकारी विकास झंजाळ यांच्या मोबाईलवर यवतमाळ येथील लल्या उर्फ ललित गजभिये याने फोन करून मन्सूरचा भाऊ कादर याला 5 लाख रुपये हप्ता देण्याचा निरोप द्यायला सांगितले. मात्र फिर्यादी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. दिनांक 31 ऑगस्ट रोजी ललित गजभिये याने वणी येथील आपल्या सहका-या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच आपले सरकार पोर्टलवर कोसारा रेतीघाटावर अवैधरित्या रेती उपसा व वाहतूक होत असल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने यवतमाळ येथील तहसीलदार यांनी फिर्यादीचे गोधनी रोड येथील गिट्टी खदान येथे धाड टाकली. मात्र तिथे अवैध रेती साठा आढळून आला नाही. तसेच मारेगाव येथील तहसीलदार यांनी मारेगाव येथील शासकीय रेती घाटावर धाड टाकली. तिथे चौकशी केली असता कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही. मंगळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी आरोपीने कोसारा येथून अवैधरित्या रेतीचा उपसा होत आहे. अशी तक्रार करत सदर रेतीघाट बंद करावा अशी मागणी केली.

बुधवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी घाटधारक आपले सहकारी, दिवाणजी व ड्रायव्हर सोबत कोसारा रेती घाटजवळ चर्चा करीत होते. दरम्यान सायंकाळी 7.30 वाजता पांढऱ्या रंगाची आय 20 कार तिथे आली. कारमधून आरोपी ललित गजभिये सोबत एक व्यक्ती खाली उतरला. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी याला बाजूला बोलावून शिविगाळ केली.

रिव्हॉल्वर लावली डोक्यावर
शिविगाळ करीत असताना आरोपीने तुझी तक्रार करूनही हप्ता का दिला नाही, असा जाब विचारत त्याच्या जवळील रिव्हॉल्वर काढून घाट मालकाच्या डोक्याला लावली. तसेच त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमांने चाकू काढून पोटाला लावला. या प्रकारामुळे फिर्यादीचे सहकारी व दिवाणजी घाबरले व त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन हप्ता देण्याचे कबुल केले. त्यानंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.

झालेल्या प्रकारामुळे घाबरलेले सैय्यद मन्सूर सैय्यद दाउद यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात तत्काळ एक पथक यवतमाळ येथे पाठविले.

पथकातील पो. उप. निरीक्षक सावंत, अजय वाभिटकर, रजनीकांत पाटील यांनी स्था. गुन्हा शाखाचे सपोनि देशमुख व सहकार्यासोबत आरोपी लल्या उर्फ ललित गजभिये याला आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी यवतमाळ येथून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा तपास व आरोपीकडून शस्त्र जप्त करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी दिली.

हे देखील वाचा: 

जनता मोदी सरकारचा सुपडा साफ करणार, प्रवीण देशमुख यांचा घाणाघात

एस.टी. बस चालकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

Comments are closed.