सीसीआयकडे कापसाचे 55 कोटी रुपयांचे चुकारे थकले
लॉकडाऊनचा बळीराजाला फटका, शेतक-यांची चिंता वाढली
जब्बार चीनी, वणी: शासनाव्दारा हमी भावात खरेदी केलेल्या 55 कोटींपेक्षा जास्त कापसांचे चुकारे दीड महिन्यांपासून सीसीआयकडे थकीत आहे. तर वीस दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने घरी पडून असलेल्या कापसाचे करायचे काय या विचाराने शेतकरी सध्या चिंतेत आहे. शासनाने त्वरित थकीत चुकारे देत कापूस खरेदी करावी अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.
वणी तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत 20 फेब्रुवारी ते 19 मार्च 2020 पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत वणी व शिंदोला च्या केंद्रावर 5 हजार 276 शेतकयांकडून जवळपास 1 लाख 1 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. याच कापसाचे जवळपास 55 कोटी रूपये सीसीआयकडे थकीत असून शेतकयांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही.
यावर्षी खुल्या बाजारात कपाशाचे क्विंटलमागे 4800 रूपये दर असताना केंद्र शासनाकडून हमीदर 5 हजार 550 रूपये देण्यात आला. सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली तेव्हा उच्च प्रतीच्या कपाशीला क्विंटलमागे 5550 रूपये दर दिला जात होता. नंतर हाच दर 5450 रूपयांवर स्थिरावला. क्विंटलमागे हजार रूपयापर्यंत फरक पडत असल्याने यावर्षी शेतक-यांचा सीसीआयकडे हमी दरात कापूस विक्री करण्यासाठी ओढा आहे.
सुरूवातीला सीसीआयव्दारे खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे पाच ते सात दिवसात शेतक-यांच्या खात्यात जमा होत होते. पण नंतर हा कालावधी वाढत जाऊन आता तब्बल दीड महिन्यापसून शेतक-यांना कापसाचे चुकारे सीसीआयकडून देण्यात आलेले नाही. तालुक्याचा विचार करता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथे 19 मार्च पासून सीसीआयची कापूस खरेदी बंद केली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद असून गत वर्षी याच कालावधीत 14 हजार 724 क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मध्यतरी झालेल्या अवकाळी पावसासह वादळीवायामुळे शेतकयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्वीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच कापसाचे चुकारे वेळीच मिळत नसल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे हे चुकारे लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.