अल्पवयीन मुलगी गर्भवती प्रकरणाला नवीन वळण, आरोपीने नसबंदी केल्याची कुजबूज
आरोपीनं नसबंदी केली असेल तर मुलीला गर्भधारणा कुणामुळे ?
वणी: वणीत खळबळ उडवून देणा-या 13 वर्षीय गर्भवती असलेल्या मुलीच्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागत आहे. या प्रकरणी आरोपी रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र रंगानं आधीच नसबंदी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मुलीला गर्भधारणा कुणामुळे झाली हा प्रश्न निर्माण होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुकूटबन येथील गोडावून जवळ पीडित तरुणी वास्तव्यास आहे. तिचं कुटुंब मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती सध्या ह्यात नाही. 13 वर्षीय मुलीचे आईवडील मरण पावल्यानं ती सध्या तिच्या मोठ्या बहीणीकडे वणीला आली होती. मोठी बहीण शहरातील सार्वजनिक दुरभाष केंद्र कार्यालयाजवळ राहते. तिथेच रंगा शंकर चिंतलवार व शारदा रंगा चिंतलवार हे जोडपे राहतात. हे सर्व भंगार वस्तू गोळा करण्याचं काम करतात.
एक दिवस पीडितेवर रंगाचा डोळा गेला. त्यानं या सोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. बालिकेनं त्याला नकार देताच शारदानं तिला मारहाण करून बळजबरीने नवरा जसं करेल तसं करत जा, असं धमकावलं. त्यानंतर नेहमी धमकावून पीडितेचं या नराधमानं तिचं शोषण केलं. अशी तक्रार आजीनं केलीये.
परिणामी पीडिता गरोदर राहीली. गरोदर झाल्यानंतर शारदा रंगा चिंतलवार हिने रंगाला विरोध केला, पण वासनेत पागल झालेल्या रंगानं तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता मुकाट्याने हा अत्याचार सहन करत होती.
दरम्यान पीडितेची आजी वणीला आली. तिला तिच्या नातीचं पोट मोठं दिसलं. तिनं याबाबत तिला विचारणा केल्यावर तिनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सध्या ती आठ महिण्यांची गरोदर आहे. हा सर्व प्रकार रंगा शंकर चिंतलवार आणि शारदा रंगा चिंतलवार यांनी संगणमताने व बळजबरीने केला असल्याचं नातीनं आजीला सांगताच आजीनं पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार पोलीसात नोंदविली. या प्रकरणी रंगाला अटक झाली असून त्याला सहकार्य करणा-या दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.
(ताबिश प्रकरण: भिसी व्यवसायातील गुंतवणुकीतून घडले नाट्य ?)
सध्या गर्भवती असलेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. रंगानं न्यायालयात नसबंदी केल्याचं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर रंगानं आधीच नसबंदी केली असेल, तर मग तिला गर्भधारणा कुणामुळे झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय अल्पवयीन मुलगी प्रसुत झाल्यानंतर तिच्या बाळाचं संगोपण कोण करणार, पालकत्व कोण स्वीकारेल, तसंच जर रंगामुळे ती मुलगी गर्भवती नसेल तर दुसरा कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.