पुरुषोत्तम नवघरे,वणी: वणी तालुक्यातील सावंगी शिवारात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम स्थळावरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळई आणि पाइप चोरून नेले होते. अवघ्या दोन दिवसात शिरपूर पोलिसांनी 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला. आकाश सुधाकर मारबते (वय 32, रा. चिंचोली, ता. वणी, जि. यवतमाळ) व जयेन्द्र महादेव निखाडे (वय 56, रा. चिंचोली, ता. वणी, जि. यवतमाळ) असे आरोपींची नावं आहेत.
कुंडलीक मनीराम ठावरी (वय 57, रा. सदाशिव नगर) हे शासकीय कंत्राटदार आहे. त्यांच्याकडे सावंगी येथील पुलाचे काम आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सावंगी शिवारात हे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी लागणारे लोखंडी सळई आणि दोन इंची लोखंडी पाइप बांधकाम स्थळावर ठेवले होते. दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री चोरट्यांनी सुमारे 20 हजारांची लोखंडी सळई व पाईप चोरून नेले होते. दुस-या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता ठावरी हे बांधकाम स्थळावर गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
असे सापडले चोरटे
चोरटे हे मुद्देमाल विकण्यास ग्राहकांचा शोध घेणार याची कल्पना शिरपूर पोलिसांना होती. त्यानुसार त्यांनी परिसरातील खबरी कामाला लावले. दरम्यान ठाणेदार सपोनि माधव शिंदे यांना चिंचोली येथील दोघे जण ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी पोउपनि रावसाहेब बुधवंत आणि पोहवा सुनिल दुबे यांना कारवाईसाठी पाठवत सापळा रचला. दरम्यान दोन्ही आरोपींकडे चोरीचा माल असल्याची खात्री पटताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. नंतर त्यांच्याकडून चोरीचा 2.5 क्विंटल सळई व पाईप असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहवा सुनिल दुबे, अविनाश बानकर, पोकॉ मंगेश सलाम, दीपक वाकडे आणि प्रफुल नाईक यांच्या पथकाने पार पाडली. स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.