आसन (उजाड) शिवारात आढळला मृतावस्थेत पट्टेदार वाघ
गळ्यात तार अडकल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव वनपरीक्षेत्रात येथ असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. आज दिनांक दुपारी 2.30 ते 3 दरम्यान ही घटना उघडकीस आली. या वाघाचे वजन सुमारे 150 किलो असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मृत वाघ बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दुपारी सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारातील कोरड्या नाल्यात परिसरातील शेतक-यांना एक वाघ दिसला. मात्र वाघ कोणतीही हालचाल करत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी वाघाजवळ जाऊन बघितले असता वाघ मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. शेतक-यांनी याची माहिती तात्काळ वनविभागाला दिली.
तारांचा फास गळ्यात अडकल्याने मृत्यू?
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ तिथे पोहोचली. तिथे त्यांना वाघाच्या गळ्यात तारांचा फास अडकल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले. हा वाघ पाण्याच्या शोधात या शिवारात असलेल्या नाल्यावर नेहमीप्रमाणे आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान शेताला लावलेल्या तारेच्या कुंपनाचा फास वाघाच्या गळ्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.
वाघ मृत झाल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. दरम्यान वाघाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मारेगाव वनपरीक्षेत्रात येत असलेल्या शिबला जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाचे वास्तव्य होते. या वाघाने अनेक जणावरांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. मृत वाघ वनविभागाने ताब्यात घेतला असून घटनेचा तपास सुरू आहे. यावेळी वनपरीक्षेत्राधिकारी विक्रांत खाडे व त्यांची टिम प्रामुख्याने उपस्थित होती.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाघाच्या मृत्यूच्या तपासासाठी नागपूर येथून एक टीम पांढरकवड्यात दाखल झाल्याची माहिती आहे. वाघाची उत्तरीय तपासणी पांढरकवड्यातील पशुंच्या दवाखान्यात केली जाणार असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा: