जब्बार चीनी, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेच्या संस्कारामुळे आदर्श नागरिक तयार होतो. देशाप्रती समर्पित देशभक्त निर्माण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव संघटना आहे. असे प्रतिपादन वणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा अभाविपचे पूर्व कार्यकर्ता तारेंद्र बोर्डे यांनी केले. ते नागपूरला होत असलेल्या 66 व्या अखिल भारतीय अधिवेशनाचे आभासी पद्धतीने उदघाटन करताना बोलत होते.
येथील नगर वाचनालयात आभासी अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण मंडळाचे प्रांत प्रकाशन प्रमुख तथा विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ता गजानन कासावार होते. प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक प्रशांत माधमशेट्टीवार, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे हे होते.
दीपप्रज्वलनानंतर सांघिकगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रशांत माधमशेट्टीवार यांनी ज्ञान, चारित्र्य, एकता हे विद्यार्थी परिषदेचे घोषवाक्य हे विद्यार्थ्यांना पावलोपावली प्रेरणा देत असते. देशभक्त युवकांची मांदियाळी या विद्यार्थी संघटनेत पाहायला मिळते.
सर्व विद्यार्थी या संघटनेचे पाईक आहात ही भाग्याची गोष्ट आहे. त्यानंतर प्राचार्य खानझोडे बोलताना म्हणाले की, परिषदेच्या कामात कार्यकर्ता ते नेता असा प्रवास व्हावा. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांचा विकास करता येतो. मन आणि बुद्धीचा विकास करण्यासाठी वाणीचा सुयोग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. कर्म, कृती लयास गेली की, कार्यकर्त्याचा समर्पण भाव नष्ट होतो.
अध्यक्षीय भाषण करताना कासावार म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन म्हणजे राष्ट्रभक्तीचा सोहळा असतो. अभाविप हे फक्त कार्यकर्ते घडवीत नाही तर नेतृत्वगुण विकसित करते. आज देशात देशभक्तीने भारावलेले कुशल नेते दिसतात, त्यात परिषदेच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.
या उदघाटन पर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीवर्धन लोथे यांनी केले. सूत्रसंचालन निपाक्षी नगराळे यांनी केले. या उदघाटन कार्यक्रमाच्या आधी शहरातील प्रमुख रस्त्यावरून परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून राष्ट्रभक्तीचा जागर केला.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा