लालगुडा चौपाटी जवळ भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा

सकाळी 11 सुमारास घटना, कारमध्ये एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती

विवेक तोटेवार, वणी: वणी- घुग्घुस रोडवर जन्नत हॉटेल जवळ एक भीषण अपघात झाला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास कारला एका ट्रकने जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चेंदामेंदा झाला. कारमध्ये बसलेले 5 ही व्यक्ती यात गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत केले. तर चौथ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या एका चिमुकलीला आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, रियाज शेख (55) हे भीमनगर वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. सध्या सुटी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार शिकवीत होते. आज शुक्रवारी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी ते त्यांच्या 3 मुली व भावाच्या मुलीला घेऊन घुग्घुस रोडवर स्कोडा (O1AH 5700) ही कार घेऊन गेले होत़े. त्यांची मुलगी लियाबा (20) ही कार चालवीत होती. दरम्यान लालगुड्याच्या आधी डीपीरोडवर टर्न घेताना समोरून येणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली.

या धडकेत कारमधले सर्व जण गंभीर जखमी झालेत. अपघात होताच घटनास्थळावरील लोक मदतीसाठी थांबले. कारला ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार ड्रायव्हर साईडने पूर्ण चेंदामेंदा झाली. लोकांनी जखमींना बाहेर काढले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डॉक्टरांनी रियाज यांची मुलगी लियाबा (20), मायरा (17), अमिरा यांना मृत घोषीत केले. तर रियाज यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या भावाची 4 वर्षाची मुलगी ही गंभीर जखमी असून तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. अपडेट – रियाज यांचा देखील मृत्यू झाला असून 4 वर्षाच्या चिमुकलीला चंद्रपूर येथून नागपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. तीन मुली व रियाज यांच्या पार्थिवावर एकाच वेळी कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

(सदर बातमी प्राथमिक माहितीवर आधारीत असून अपडेट येताच बातमी अपडेट केली जाईल)

Comments are closed.