नियंत्रण सुटून कारची इलेक्ट्रिक पोलला जबर धडक

घरापासून अवघ्या 100 मीटर अंतराआधी अपघात....

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाला बल्लारपूरला सोडून वणीला परत येताना घरापासून अवघ्या काही अंतराच्या आधी भरधाव कारने इलेक्ट्रीक पोलला जबर धडक दिली. आज शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवर ही घटना घडली. चालकाला डुलकी आल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे. या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ईलेक्ट्रीक पोल व कारचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहिती नुसार आशिष झामड (44) हे साई मंदिर चौक मणीप्रभा टॉवर, नांदेपेरा रोड येथे राहतात. त्यांचे मणीप्रभा टॉवर मध्येच प्लायवूडचे दुकान आहे. 24 मे रोजी मध्यरात्री ते त्यांच्या पत्नीसह पाहुण्यांना सोडण्यासाठी बल्लारशाह येथे गेले होते. त्यांनी पाहुण्यांना बल्लारपूर येथे सोडले. पहाटे 3 वाजताच्या सुमारास ते वणीला परतत होते.

परत येताना त्यांना वणीच्या आधी झोप आली. त्यामुळे तिथे ते काही वेळ थांबले. मात्र घर 2-3 किलोमीटरवरच असल्याने त्यांनी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. अगदी घरापासून 100 मीटरपेक्षा कमी अंतर असताना डुलकी आली व आशिष यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यांची भरधाव असलेली कार सिमेंटच्या इलेक्ट्रीक पोलला धडकली.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

गाडीत एअर बॅग असल्याने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत झामड दांपत्याला किरकोळ जखम झाली. ही धडक इतकी जबर होती पोल संपूर्ण वाकून तो गाडीच्या समोरील काचावर पडला. तर कार समोरून चेंदामेंदा झाली. याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

Comments are closed.