मजुरांचे पैसे देऊन परतताना मिस्त्रीचा अपघाती मृत्यू

खैरगावजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला जबर धडक

भास्कर राऊत, मारेगाव: मजुरांचे पैसे देऊन गावी परत जाणा-या बांधकाम मिस्त्रीच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. संजय पांडुरंग धारणे (अंदाजे 48) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या दुचाकीची एका उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. हा अपघात शनिवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडला. 

सविस्तर वृत्त असे की मृतक संजय पांडुरंग धारणे हे तालुक्यातील किन्हाळा येथील रहिवाशी होते. ते मिस्त्रीकाम करायचे. तसेच ते ग्रामीण भागातील छोट्या बांधकामाचे ठेके ही घ्यायचे. नेहमीप्रमाणे ते साईटवरचे काम आटपून खैरगाव येथे मजुरांना त्यांच्या स्प्लेंडर प्लस (MH40 D6382) या दुचाकीने मजुरी देण्यासाठी गेले होते. मजुरांना पैसे देऊन ते किन्हाळा येथे परतत होते. तीन दिवसांआधी मार्डी-खैरगाव रोडवर एक ट्रक जळाला. त्यामुळे मार्डी-खैरगाव रोडवरच हा ट्रक उभा आहे.

रात्री 10 वाजताच्या सुमारास गावाकडे परतत असताना संजय यांचे दुचाकवरील नियंत्रण सुटले व त्यांच्या गाडीने उभ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की त्यांच्या डोक्याला भीषण दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान काही वेळानंतर या रस्त्यावरून जाणा-या प्रवाशांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती तात्काळ मारेगाव पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

संजय यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व आप्तपरिवार आहे. संजय यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासन लक्ष देणार का?
मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक होते. अनेकदा अपघात होतात. असे अपघात झालेले वाहन रस्त्याच्या कडेलाच अनेक दिवस उभे असतात. अशा वाहनाला दुचाकीची धडक होऊन कायमच छोटे मोठे अपघात घडतात. शनिवारी झालेला अपघातही जळल्याने उभ्या असलेल्या ट्रकला धडक झाल्याने झाला. यात दुचाकीस्वाराचा नाहक बळी गेला आहे. भविष्यात असे अपघात होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या वाहनांबाबत संबंधीत विभाग काही कार्यवाही करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुचाकीस्वारांना हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’ तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा: 

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.