नायगावजवळ पुन्हा अपघात; एक इसम जागीच ठार

0

वणी/विवेक तोटेवार: रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास सावर्ला ते नायगाव रोडवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक इसम जागीच ठार झाला आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, संदीप कवडुजी गौरकार (29) हे माजरी येथे डब्लूसीएल मध्ये काम करतात. सकाळी 8 वाजता संदीप आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 29 ए पी 8527 ने बंडू घुलाराम लोढे यांच्यासोबत कर्तव्यावर माजरी येथे जात होते. ते नायगावच्या समोर असताना विरुद्ध दिशेने येणार ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 7130 हा ट्रक येत होता. संदीपच्या दुचाकीच्या पुढे ट्रॅक्टर क्रमांक एम इह 29 व्ही 4076 व ट्राली क्रमांक एम एच 34 ए पी 4637 होते. अचानक ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने ट्रॅक्टरच्या ट्रालीला धडक दिली. धडक इतकी जबर होती की, ट्रॅक्टरची ट्राली तुटून मागून येणाऱ्या संदीप व बंडूच्या अंगावर पडली. ज्यामध्ये संदीप हा जागीच ठार झाला.

प्रत्यक्षदर्शीनी मदत करीत संदीप व बंडूला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. बंडूवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याला डोक्याला, हाताला व पायाला दुखापत झाली आहे. या धडकेत ट्रॉलित बसून असलेले मजूर अमित पाल व सतीश यादव यांनाही खाली कोसळल्याने गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हा अपघात घडल्यानंतर ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहे. या अपघाताची तक्रार संदीपचे काका दामोदर गौरकार यांनी वणी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी तक्रारिवरून आरोपी ट्रक चालकावर कलम 337, 338, 304 ए नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जमादार वासुदेव नारनवरे करीत आहे.

8 दिवसात 2 अपघात, प्रशासन सुस्त…
विशेष म्हणजे या 8 दिवसात या ठिकाणी 4 अपघात झाले. ज्यामध्ये सुरवातीला दोन इसमाचा अपघात झाला त्यात ते दोघेही ठार झाले. त्यानंतर वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयातील प्राध्यापकाचाजागीच मृत्यू झाला. त्यानंतर याच ठिकाणी एक 7 वर्षीय बलिकेचा अपघातात मृत्यू झाला. याच ठिकाणी अपघात का होत आहे. याच विचार करणे आता आवश्यक होऊन बसले आहे. या ठिकाणी रस्ता हा लहान आहे त्यातच वाहनांची वर्दळ अधिक आहे. या रस्त्यावर मोठी वाहने वेगाने चालत असल्याने गती अवरोधक बनविण्याची आवश्यकता आहे. रस्ता लहान असल्याने अपघात होत आहे. तेव्हा रस्ता बनणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याला कुठेही रेडियम लावले नाही. आता प्रशासनाने जागे होणे आवश्यक आहे. जर प्रशासन असेच सुस्त राहते तर पुन्हा अपघातात बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.