नायगाव जवळ अपघात, एक जागीच ठार, तर एक गंभीर

भरधाव झायलो गाडीने दिली दुचाकीला जबर धडक, सोमवार ठरला अपघाताचा वार...

रमेश तांबे, वणी: भरधाव येणा-या एका झायलो गाडीने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक हा ठार झाला तर मागे बसलेला त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास गुंजच्या मारोतीपासून काही अंतरावर नायगाव शिवाराजवळ हा अपघात झाला. रुपेश ढोके (36) रा. माजरी कॉलरी असे मृताचे नाव असून त्याचा सहकाही सागर झरीया (26) हा जखमी आहे.

सविस्तर वृत्त असे की मृत रुपेश ढोके रा. माजरी कॉलरी हा 3-4 मित्रांसह दुपारी वणीतील आनंद नगर येथे मित्राचे घर पाहण्यासाठी दुचाकीने आला होता. रात्री 11 वाजताच्या सुमारास ते सर्व दुचाकीने माजरी येथे परत जाण्यासाठी निघाले. रुपेश ढोके हा पॅशन या दुचाकीवर (MH 34 W6616) होता. त्याच्या मागे त्याचा मित्र सागर झरीया (26) बसला होता. दरम्यान रात्री 11.30 वाजताच्या सुमारास वरो-याकडून वणीकडे एक महिंद्रा झायलो गाडी (MH29 Z7861) भरधाव वेगात येत होती. त्यांनी नायगावजवळ रुपेशच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

रुपेश आणि सागर दोघेही खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. मागून येणा-या मित्रांना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वणी मित्राला याची माहिती दिली. घटनास्थळी ऍम्बुलन्स बोलावण्यात आली. जखमींना तात्काळ वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी दरम्यान रुपेश ढोके (36) रा. माजरी कॉलरी याला मृत घोषीत केले. तर त्याचा सहकाही सागर झरीया (26) रा. माजरी कॉलरी याच्यावर उपचार सुरू केले.

सागरची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. रुपेशचा त्यांचा मित्र शुभम कांबळे माजरी यांच्या तक्रारीवरून झायलोच्या चालकावर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

सोमवारी दिवसभरात 3 अपघात
सोमवारी हा दिवस वणी शहरासाठी काळा ठरला. परिसरात सकाळपासून रात्री पर्यंत 3 अपघात झाले. सकाळी भालर रोडवर दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने अपघात झाला. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घोन्सा फाट्याजवळ पिकअपने ऑटोला धडक दिली. यात 8 लोक जखमी झाले. तर रात्री नायगाव जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

वणी-मुकुटबन रोडवर पिकअपची ऑटोला भीषण धडक

निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह गावालगत शेतात आढळला

Comments are closed.