विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने रस्त्याने जाणा-या महिलेला जबर धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला उपचाचासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. तालुक्यातील पेटूर जवळ रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आशा जनार्धन नांदे (50) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून कार चालकाविरुध्द विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक आशा जनार्धन नांदे (50) ही पेटूर येथील रहिवासी होती. ती गावात दोन मुलांसह राहते. पेटूर गावापासून मुकुटबन येथे रस्ता जातो. रस्त्याच्या एका बाजूला महिलेचे जुने घर आहे. तर नवीन घराचे बांधकाम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरू आहे. घराचे काम सूर असल्याने रविवारी संध्याकाळी आशा या मुकुटबन रस्ता ओलांडून नवीन घराकडे जात होती.
याचवेळी मुकुटबनच्या दिशेहून वणीच्या दिशेने एक भरधाव डस्टर कार (MH 31 EA 8229) येत होतो. या कारने आशाला धडक दिली. धडकेत आशा गंभीर जखमी झाली. तिला सुरवातीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती नाजूक असल्याने तिला नागपूरला रेफर करण्यात आले. मात्र उपचासाठी नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
आशाच्या मोठया मुलाच्या तक्रारीवरून कार चालक गणेश बाबाराव झाडे रा. बाबापूर याच्याविरोधात कलम 281 106 (1) भा. न्या. सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.
Comments are closed.