निकेश जिलठे, वणी: एका सिमेंट भरलेल्या भरधाव ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. वणी-शिंदोला मार्गावर शिंदोला गावाजवळ हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध शिरपूर पोलीस घेत आहे.
सविस्तर वृत्त असे की मृतक गजानन मोहन हिंगाने (55) हे मुळचे ल. पांढरकवडा ता. झरी जामनी येथील रहिवासी होते. ते गेल्या 10 वर्षांपासून त्यांची सासुरवाडी असलेल्या पाथरी ता. वणी या गावात राहत होते. त्यांच्या राळेगाव येथे राहत असलेल्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शनिवारी दिनांक 23 रोजी ते नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला राळेगाव येथे त्यांच्या दुचाकीने (MH 29 AC-8023) गेले होते.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुपारी ते राळेगाव वरून वणी, शिंदोला मार्गे पाथरी गावी परतत होते. दरम्यान 3.30 वाजताच्या सुमारास शिंदोल्यावरून एक सिमेंट भरलेला ट्रक (MH29-BE-4495 ) वणीच्या दिशेने जात होता. या भरधाव ट्रकने गजानन यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गजानन हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान या वेळी पाथरी गावातील पवन बोराडे व गजानन यांचा पुतण्या जयंत काळे हे याच मार्गाने दुचाकीने येत होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच ते घटनास्थळी थांबले. त्यांना गजानन हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांचे डोके, हात, पायाला गंभीज इजा झाली होती. पवन आणि जयंत यांनी तात्काळ ऍम्बुलन्स बोलावली व गजानन यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
घटनेची माहिती मिळताच मृतकाचे भाऊ गणेश मोहन हिंगाने यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी ट्रकचालक आरोपी विरोधात भादंविच्या कलम 279, 304 (अ), तसेच मोटर अधिनियमच्या कलम 134 (अ), 134 (ब) व 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.