कायर रोडवर भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

नाईट शिफ्ट संपवून सकाळी घरी परतताना अज्ञात वाहनाची धडक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-कायर रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर धडक देणारा वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. सकाळी 6.30 वाजता साईलीला नगरीजवळ हा अपघात झाला. अमर रतन करसे (45) असे मृताचे नाव असून तो झरी येथील ग्रामीण रुग्णालयात नोकरी करीत होता. रात्र पाळी होऊन तो सकाळी वणीला परतत असताना हा अपघात झाला.

अमर हा वणीतील सेवानगर येथील रहिवासी होता. तो झरी येथील रुग्णालयात नोकरी करीत होता. शुक्रवारी रात्री तो नाईट शिफ्ट असल्याने झरी येथे गेला होता. शिफ्ट संपल्यानंतर आज शनिवारी दिनांक 21 जून रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास तो वणीसाठी दुचाकीने निघाला. मात्र वणीनजीक कायर रोडवरील साईलीला नगरीजवळील एका बारसमोर त्याच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणा-या नागरिकांना हा अपघात झाल्याचे आढळले. त्यांनी तातडीने पोलिसांना कॉल करून याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. घटनेची माहिती मिळताच तिथे बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

अमर हा झरी येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदक म्हणून काम करीत होता. तो घरातील एकमेव कमावता आधार होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. या घटनेमुळे सेवानगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. धडक देणा-या वाहनाचा वणी पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.