नायगाव-बेलोरा मार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर एक जखमी.....

0

विवेक तोटेवार, वणी: पुनवट ते घुग्गूस मार्गाने एकाच दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. सदर अपघात दि. 26 सोमवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नायगाव ते बेलोरा रस्त्यावर झाला. 

प्राप्त माहितीनुसार, वणी तालुक्यातील पुनवट येथील रहिवासी दिनकर उकिनकर (61) हे पुनवटहून घुग्गूसला त्यांच्या स्कुटीने (एम.एच.29 बीआर 2352) जात होते. याच वेळी राहुल जिरापुरे (35) रा. यवतमाळ हे त्यांच्या कारने (एम.एच. 29 बीसी 7345) यवतमाळहून राजुरा येथे जात होते. ते बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. दरम्यान नायगाव ते बेलोरा मार्गावर स्कुटीला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीचालक उकिनकर हे त्यांच्या दुचाकीसह डिवायडरवर फेकले गेले. तर कार रस्त्यावर उलटली.

या अपघातात दुचाकीस्वार उकिनकार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर कारचालक राहुल जिरापुरे हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही जखमींना घुग्गूस येथील राजीव रतन दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. दुचाकीस्वार दिनकर उकिनकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जिरापुरे यांना उपचार करून सुटी देण्यात आली.

हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या अपघातामुळे काही काळासाठी ट्राफिक जाम झाली होती. कार बाजुला केल्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली. सदर अपघाताचा तपास शिरपूर पोलीस तपास करीत आहेत. 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.