ऍड. देविदास काळे यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा अबाधित राहणार ?

आजी माजी आमदार एकत्र येऊनही विरोधकांचा दरवेळी पराभव.... चार महिन्याआधी झालेल्या रंगनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीतही विरोधकांना धुळ चारत काळे यांनी केले सहकार क्षेत्रातील वर्चस्व सिद्ध

जितेंद्र कोठारी, वणी: सहकार क्षेत्रात परिसरातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटीव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. च्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी येत्या 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ऍड. देविदास काळे यांच्या सहकार पॅनलसह या निवडणुकीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार तसेच कॉम्रेड अनिल हेपट यांचे पॅनल देखील नशिब आजमावणार आहे. आजी माजी आमदार व विद्यमान अध्यक्ष आमनेसामने आल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मात्र सहकार क्षेत्रातील ऍड देविदास काळे यांचा अनुभव व सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य बघता आजी माजी आमदार व कामगार नेत्यांना या निवडणुकीत चांगलाच घाम गाळावा लागत आहे. आजी माजी आमदार एकत्र येऊनही विरोधकांना दरवेळी काळे यांच्या विरोधात दरवेळी पराभव पत्करावा लागत आहे. विशेष म्हणजे चार महिन्याआधी झालेल्या रंगनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीतही एकत्र आलेल्या सर्व विरोधकांना चारीमुंड्या चित करत ऍड. काळे यांनी सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे ऍड. देविदास काळे यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा अबाधित राहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

परिसरात सहकार क्षेत्रात ऍड. देविदास काळे यांचे एकहाती वर्चस्व आहे. वसंतची दोन टर्म असो किंवा नुकतिच झालेली रंगनाथ पतसंस्थेची निवडणूक असो. दरवेळी अनेक मातब्बर नेते, आजी माजी आमदार एकत्र येत त्यांच्या या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी एकत्र येतात. मात्र दरवेळी त्यांच्या पदरी निराशा येते. यावेळीही वसंत जिनिंगमध्ये परिवर्तनाचा मुद्दा घेत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल उभे करण्यात आले आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी शेतकरी एकता पॅनल अंतर्गत भाजपचे संचालक मंडळ बसविण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे.

वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकुरवार व ऍड. देविदास काळे या तीन मातब्बर राजकारण्यांच्या महायुद्धात कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड व शेतकरी संघटना पुरस्कृत वसंत जिनिंग बचाव पॅनल नावाने चौथ्या पॅनलने रणांगणात उडी मारून निवडणूक रंगतदार केली आहे. माजी आमदार वामनराव कासावार धुरंधर राजकारणी आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही राजकारणाचा दीर्घ अनुभव आला आहे. मात्र ऍड. देविदास काळे यांना राजकारणासह सहकार क्षेत्राचाही वारसा लाभलेला आहे.

सहकार क्षेत्रातील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेला शिखरावर नेण्याचे श्रेय ऍड. देविदास काळे यांनाच दिले जाते. काही महिन्याआधी या पतसंस्थेच्या निवडणुकीत आजी माजी आमदारांसह अनेक धुरंधर एकत्र आले होते. मात्र विरोधकांना धुळ चारत त्यांनी सहकार क्षेत्रातील आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले. याशिवाय डबघाईस आलेली वसंत जिनिंग फॅक्टरीला कौशल्याने रुळावर आणण्याचे कार्य ऍड. काळे यांनी मागील 10 वर्षात केले. वसंतच्या गेल्या दोन निवडणुकीतही ऍड. देविदास काळे यांनी आजी माजी आमदारांना धुळ चारून आपले सहकार क्षेत्रातील वर्चस्व सिद्ध केले आहे.

राजकारणामुळे सहकार क्षेत्राची अधोगती – ऍड. देविदास काळे
लोकांचे, लोकांद्वारे, लोकांसाठी (Of the people, by the people, for the people) हे सहकार क्षेत्राचे मूळ तत्व आहे. जेव्हापासून सहकार क्षेत्रात काही महत्त्वाकांक्षी राजकारणी लोकांचे प्रवेश झाला, तेव्हापासुन सहकार क्षेत्र अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील 10 वर्षात आम्ही वसंत जिनिंग या सहकारी संस्थेला राजकारण्यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत संस्थेचे सुज्ञ मतदार परत आम्हाला संधी देणार, असा विश्वास आहे.
– ऍड. देविदास काळे – जय सहकार पॅनल

वसंत जिनिंगच्या गेल्या दोन निवडणुकीत ऍड देविदास काळे गटाला एकतर्फी विजय मिळाला आहे. शिवाय काही काळा आधी झालेल्या रंगनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीतही त्यांच्या पॅनलने आपली जादू दाखवत सर्व विरोधकांना धूळ चारत संपूर्ण संचालक मंडळावर त्यांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले. हीच जादू वसंत जिनिंग निवडणुकीत कायम ठेवून ऍड देविदास काळे सहकार क्षेत्रातील आपला दबदबा सिद्ध करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.