जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग न घेता महावितरणने वीज ग्राहकांना सरासरी रकमेचे बिल मोबाईल एसएमएस व महावितरण ऍप्स वर पाठविले. मात्र आता तीन महिन्यांची एकत्र मीटर रीडिंग घेऊन पाठवलेले वीज बिलांचे भरमसाठ आकडे बघून वीज ग्राहकांना कोरोनापेक्षा मोठा ‘शॉक’ बसला आहे.
मार्च ते मे 2020 या कालावधीत ग्राहकांनी प्रत्यक्ष वापर केलेल्या विजेच्या मूळ देयकापेक्षा 60 ते 70 टक्का “अतिरिक्त शुल्क” महावितरण कडून ग्राहकांवर लादण्यात आले आहे. महावितरण कंपनी मार्फत मुळ वीज वापरा च्या एकूण बिलावर चार प्रकारचे अतिरिक्त चार्जेस लावले जातात. अतिशय छुप्या पध्दतीने महावितरण कंपनीने एप्रिल महिन्याच्या वीज देयकांत 77 टक्के, मे महिन्याच्या विज बिलात 54 टक्के आणि जुन महिन्याच्या विज बिलात 54 टक्के अतिरिक्त वीज शुल्क ग्राहकांवर लादले आहे.
म्हणजे एखाद्या ग्राहकाचे एप्रिल महिन्याच्या वीज बिलाची मुळ रक्कम 100 रूपये असेल तर त्यावर 77 रूपये अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. म्हणजे त्या ग्राहकाला 177 रूपये बिल भरावे लागणार आहे. वीज ग्राहकांना माहीत नसलेले अतिरिक्त शुल्काचे वेगवेगळे चार प्रकार या प्रमाणे आहे.
- “फिक्स चार्जेस” म्हणजेच स्थिर आकार
- “व्हिलींग चार्जेस” म्हणजेच वहन आकार
- “एफसीए चार्जेस’ म्हणजेच फ्युएल कॉस्ट ऍजजेस्टमेंट चार्जेस.. इंधन समायोजन आकार
- “अतिरिक्त वीज शुल्क” म्हणजे एकूण वीज देयका च्या १६ टक्के
अशा चार वेगवेगळ्या प्रकारे शुल्काची आकारणी करण्यात आली आहे.
यातील “फ्यूल कॉस्ट ऍडजेस्टमेंट” इंधन समायोजन आकार या अतिरिक्त शुल्काची मे आणि जुन महिन्याच्या बिलात आकारणी केलेली नाही. विशेष म्हणजे ग्राहकांवर लादण्यात आलेले हे चारही अतिरिक्त शुल्क ज्या शुल्काला महावितरण “आकार” असे म्हणते हे ग्राहकाने प्रत्यक्षात वापरलेल्या” वीजेच्या आकारा व्यतिरिक्त” आहेत.
वास्तविक इलेक्ट्रीक बिला व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्कच्या नावावर भरमसाठ आकारणीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने अतिरिक्त शुल्क वजा करून बिल भरणा मंजूर करावे अशी मागणी वीज ग्राहकांकडून होत आहे.