जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरन करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत (मंगळवार सकाळी 11.00 वा.) 56 लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. मात्र यातील काही लोकांना होम कॉरेन्टाईन होण्याची सवलत देण्यात आल्याने विलगीकरणात भेदभाव केला जात असल्याचा आरोप परसोडा येथे विलगीकरण कक्षात असलेल्या काहींनी केला आहे. त्यामुळे काही उच्चभ्रु घरी तर सर्वसामान्य व नोकरदार वर्ग विलगीकरण कक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. यात संपर्क आलेल्या व्यक्तींमध्ये कुटुंबीय, मित्रपरिवार, नोकरवर्ग, संबंधीत यांचा समावेश आहे. मात्र यातील काही मंडळींना होम कॉरेन्टाईनची सवलत दिल्याने त्यावर आता आक्षेप घेण्यात येत आहे. मुंबईहून वणीत परतलेले होम कॉरेन्टाईन झाल्यानंतर त्यांच्यात कोविडचे लक्षणं दिसून आले होते. याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नव्हती. त्यातच चार व्यक्ती प्रशासनाला कोणतीही माहिती न देता नागपूरला उपचारासाठी गेलेत. असे असतानाही होम कॉरेन्टाईनची सवलत का दिली जात आहे? असा सवाल उपस्थित करून पुन्हा अशी जोखीम प्रशासन का उचलत आहे असा प्रश्न विलगीकरण कक्षातील काहींनी विचारला आहे.
विलगीकरण कक्षात सोयीसुविधांचा अभाव
परसोडा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यातील खोल्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आले आहे. मात्र यात सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रार आहे. इथे कॉमन वॉशरूम, पाण्याची व्यवस्था नाही अशा विविध समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर याबाबत विलगीकरणात असलेल्या काहींनी वरपर्यंत याबाबत तक्रार केल्यानंतर प्रशासनाने इथे भेट देऊन इथल्या सोयीसुविधेबाबत तपासणी केली. सध्या इथल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्थाही विलगीकरण कक्षात असलेल्या एकाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
परसोड्यातून थेट होम कॉरेन्टाईन
विलगीकरण कक्षात असलेल्या एका व्यक्तीने कोविड केअर सेंटरमधल्या सोयीसुविधेबाबत आक्षेप घेत अख्खा सेंटर डोक्यावर घेतला होता. त्या व्यक्तीची परसोड्यातील विलगीकरण कक्षातून थेट घरी रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे. काही लोकांना आधीच वैद्यकीय व इतर महत्त्वाच्या कारणामुळे होम कॉरेन्टाईन होण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता भेदभाव होत असल्याचा आरोप करत पुन्हा प्रशासनाने कोणतीही जोखीम उचलू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान उच्चभ्रूंना वेगळा न्याय आणि गरीब, नोकरदार व सर्वसामान्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाकडे पुरेशी व्यवस्था नसताना होम कॉरेन्टाईनच्या नियमांना बगल देण्यात आली होती. असे असतानाही होम कॉरेन्टाईन करून प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यानच्या काळात आयोजित झालेल्या पार्टीची माहिती काढावी अशी ही मागणी जोर धरत आहे. आतापर्यंत 56 व्यक्तींना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. तर 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. त्यातील परवा पाठवण्यात आलेल्या 15 व्यक्तींचे रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. दरम्यान वणीतील परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी येणार असल्याची माहिती आहे.
‘एकमेकांना धीर देऊन संकटाशी लढावे’
कोरोनाच्या काळात परिसरात अनेक अफवा, शंका याला पेव फुटले आहे. जे कुटुंब आणि व्यक्ती याच्या विळख्यात आले आहे. त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे असून एकमेकांना धीर देऊन, सांभाळून या संकटाशी लढावे. तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून संपूर्ण खबरदारी घ्यावी असे आवाहन परिसरातील सुजाण नागरिक व ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.