नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या अडीज महिन्यांपासून तालुक्यातील केश कर्तनालय दुकाने बंद असल्याने नाभिक समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. केश कर्तनालय सुरू करा नाहीतर आम्हाला आर्थिक मदत करा या मागणीसाठी नाभिक समाज संघटना मारेगावच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
समाजाच्या परंपरेनुसार नाभिक समाजाचा केश कर्तनालय हा प्रमुख व्यवसाय असून याच व्यवसायावर तालुक्यातील शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. परंतु अवघ्या जगा सह देशात “कोरोना” महामारीने थैमान घातल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला राज्यात लॉकडाऊन अमलात आणावा लागला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाऊन पासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शेकडो केश कर्तनालय गेल्या अडीज महिन्यापासून बंद आहे. परिणामी नाभिक समाजाच्या तालुक्यातील शेकडो व्यसायिकांच्या कुटुंबावर उपास मारीची वेळ आल्याने पाचवा लॉकडाऊन दरम्यान सुद्धा दुकाने चालू करण्याचे आदेश नसल्याने, “केश कर्तनालय सुरू करा, नाहीतर आर्थिक मदत करा” या प्रमुख मागणीसाठी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राजू चौधरी, विनोद नक्षणे, प्रमोद नक्षणे, लक्ष्मण चावखे, शालीक जांभुळकर, आनंद नक्षणे, मोरेश्वर बन्सोड, प्रवीण जांभुळकर, रमेश कडुकर, महादेव मांडवकर, रमेश सूर्यवंशी, प्रभाकर जांभुळकर आदी नाभिक समाज संघटनेचे व्यवसायिक उपस्थित होते.