‘अमृत’मंथनातून बळीराजांनी मिळवलं पांढरं सोनं
अमृत पॅटर्न कपाशीच्या लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी
जब्बार चिनी, वणी: समुद्रमंथनातून देव-दानवांच्या अथक संघर्षातून अमृत खेचून आणल्याची कथा सर्वांना माहीत आहे. अथक परिश्रमातून दोन भावांनीदेखील ‘अमृत’ खेचून आणले. या बळीराजांनी अमृत पॅटन कपाशी लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी केला.
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे, शेती करण्याच्या नवनवीन प्रयोगाने प्रगती साधने ही उदिष्टे समोर ठेवून कोण केव्हा आणि कसा प्रयोग करेल यांची काही शाश्वती नाही. त्यात शेतात प्रयोग करुन शेती करणाऱ्याची संख्या फारच कमी आहे. एखाद्याच शेतकरी शेतात प्रयोग करण्याचे धाडस करतो, असेच धाडस करुन शेतात प्रयोग करुन पीक घेण्याचा प्रयत्न युवा शेतकरीपुत्रांनी केला.
ही भांवडे वणी तालुक्यातील कायर येथील आहेत. या भावडांची कपाशी कायर परिसरातील शेतकर्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कायर येथील अनिल देवेन्द्र बोगुलवार व सुनील देवेन्द्र बोगुलवार या भावांनी कायर परिसरात कपाशी लागवडीचा अफलातून प्रयोग केला.
अनिल व सुनील या भावांनी दोन एकर जागेवर अमृतराव देशमुख पॅटर्नने कपाशीची लागवड केली. कपाशी लागवडीचे हे पहिले वर्ष आहे. कपाशीची उंची 7 फूट आहे. दोन झाडांमधील अंतर 5 बाय 7 फूट असून पऱ्हाटी 1 फूट अंतरावर सारापद्धतीने लावली आहे.
सध्या पराटीला मुख्य फांदी 4 ते 5 आहे. फळफांदी 20 ते 25 असून प्रत्येकी फळफांदीला 14 ते 15 बोंडे लागली आहेत. तर जेवढी बोंडं त्याच्या दुप्पट फूलपाचळ आहे. पऱ्हाटीवर आजच्या स्थितीला बोंडअळीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. 90 ते 95 बोंडांपर्यंत हे यश पोहचले आहे.
त्यामुळे त्यांना या पॅटर्नचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भांवडे परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्या भांवडाना अमृतपॅटर्न कपाशीविषयी माहीती तुम्हाला त्यांना कशी झाली असे विचारले असल्यास अमृतराव देशमुख ता. महागाव जि. यवतमाळ यांच्या यू-ट्यूब माध्यमातून माहीती मिळाली, असे ते सांगतात. तसेच समोरील पिकेसुद्धा याच पॅटर्ननुसार घ्यायचे त्यांनी ठरविले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)