वृद्ध महिलेला मंदिरात गंडवणा-या प्रकरणाचा लागला छडा

ठगांची टोळी असल्याचे उघड, मध्यप्रदेश येथून 5 भामट्यांना अटक, वणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठड्यात वणीतील राम मंदिरात एका वृद्ध महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने गंडवले होते. 60 हजारांचे दागिने घेऊन हा भामटा लंपास झाला होता. या प्रकरणाचा छडा लागला असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी जरी एका भामट्याने ठगवले असले तरी ही संपूर्ण टोळी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा मध्यप्रदेश येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून लंपास केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील एचडीएफसी बँकेजवळ राम मंदिर आहे. मंदिरासमोरच सुनंदा अरविंद वैद्य (75) राहतात. सुनंदा वैद्य या रोज घरासमोरील राम मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी त्या एका महिलेसह पूजा करण्यास केल्या. त्यांची पूजा सुरु असताना पांढरे कपडे घालून एक भामटा तिथे पोहोचला. त्याने आज दुकानाचे उद्घाटन आहे माझ्या कडून तुम्ही पूजा करा अशी सुनंदा यांना विनंती केली. त्याने 1100 रुपये पूजेच्या थालीत ठेवत पूजेत सोन्याचे दागिने असल्यास कृपा होईल व दुकान चांगले चालेल असे सांगितले. त्याच्या बोलण्यात येऊन सुनंदा यांनी सोन्याची चैन व सोन्याच्या बांगड्या पूजेच्या थालीतील रुमालात ठेवल्या.

पूजा झाल्यावर रुमाल उघडाल असे सांगून तो भामटा मंदिरातून निघून गेला. पूजा संपल्यावर 10 मिनिटांनी सुनंदा यांनी रुमाल उघडून बघितला असता. त्यात 1100 रुपयेही नव्हते व त्यांचे सोन्याचे दागिनेही नव्हते. दरम्यान या ठग हातचलाखीने दागिने काढून पळून गेला होता. या प्रकरणी 2 सोन्याच्या बांगड्या ज्याची किंमत 37 हजार 500 रुपये व सोन्याची चेन ज्याची किंमत 22 हजार 500 रुपये असे एकूण 60 हजारांचे दागिने लंपास केले. याबाबत सुनंदा यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

तपास अधिकारी सपोनि आनंदराव पिंगळे यांनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आपले खबरी या कामासाठी लावले होते. दरम्यान एका खबरीद्वारा त्यांना अशा प्रकरची चोरी करणारी एक टोळी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्हयात गेली असल्याचे कळले. त्यानुसार त्यांनी छिंदवाडा जिह्यातील पांढुर्णा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला. पांढुर्णा पोलिसांनी अधिक माहिती काढली असता त्यांना या टोळीची संपूर्ण माहिती मिळाली.

पांढुर्णा पोलिसांनी 5 जणांच्या टोळीला दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली. वसीम अब्बास सिराज वय 37 वर्ष रा आंबिवली कल्याण-मुंबई, माशा अल्लाह मुनब्बर अली वय 32 वर्ष रा. बुडार जि. शहडोल, मुख्तार अली पिल्लु अली वय 38 वर्ष भोपाळ, जितेंद्र गोकुल प्रसाद राय वय 30 वर्ष रा. निशादपुरा भोपाळ, गंगाराम नटराम नरबंरिया वय 45 वर्ष रा. भानपुर भोपाल असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांना अशाच प्रकारची चोरी चंद्रपूर, हिंगणघाट व वणी येथे केले असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून वणी येथून लुटलेला मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

त्यांच्याविरुद्ध पांढुर्णा पालीस स्टेशन ठाण्यात भादंविच्या कलम 399, 402 व भारतीय हत्यार कायदाच्या कलम 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हा हा पांढूर्णा येथून वणी पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आला आहे. सदर कार्यवाही डॉ. दिलीप पाटील–भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप वि.पो.अ वणी, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि आनदराव पिंगळे, पोहवा/सुदर्शन वानोळे, पोना/ सुनिल खंडागळे, हरीन्द्रकुमार भारती, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वांड्सवार, विशाल गेडाम मो.वसिम यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

महिलांनीही आता सहकार क्षेत्रात पुढाकार घ्यावा: आ. प्रतिभा धानोरकर

अन् जेव्हा चक्क लोकप्रतिनिधीलाच लागतो मटका…!

Comments are closed.