अंगणवाडी सेविकांचा एल्गार, मोर्चाने दणाणले वणी शहर

वेतन वाढीसह विविध मागण्यासाठी जेल भरो आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: विविध मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस 4 डिसेंबर पासून संपावर आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 27 डिसेंबर रोजी वणीत या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चा काढत टिळक चौक येथे जेलभरो आंदोलन केले. या भव्य मोर्चा व आंदोलनाने वणीकरांचे लक्ष वेधून घेतले. विविध मागण्यांचे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देऊन आंदोलनाची सांगता झाली. या मोर्चात विविध पक्षाचे नेते सहभाग होत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी आंदोलकांशी चर्चा करीत त्यांना येणा-या काळात मनसेतर्फे जीवन विमा काढून देण्याचे आश्वासन दिले.

अंगणवाडी सेविकांना 26 हजार रुपये व मदतनीसला 22 हजार वेतन देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी देण्यात यावी, त्यांना पेंशन लागून करण्यात यावे, पूरक पोषण आहाराचे दर तिप्पट वाढवून देण्यात यावे. मुख्यमंत्री यांनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचे मान्य केले होते त्यानुसार मोबाईल देण्यात यावे. दुर्गम व अतिदुर्गम भागत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.

अंगणवाडी सेविकांना रजिस्टर व आवश्यक कागदपत्रे शासनाकडून पुरविण्यात यावी. सेविकांना आजारपणात 1 महिन्याची सुट्टी भरपगारी देण्यात यावी. 10 वी पास असणाऱ्या मदतनिसांची सेविकापदी भरती करावी. इत्यादी मागण्या अंगणवाडी सेविकांच्या आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या 1975 पासून सेवा देत आहेत. पूर्णवेळ लहान बालके, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा मातांना ते आपली सेवा देतात. सोबतच पोषक आहार, लसीकरण, पूर्व प्राथमिक शिक्षण, गृहभेटी ह्या सेवा एकात्मिक बालविकास सेवा विभागाद्वारे काम करतात. परंतु त्यांना अनेक वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

या जेलभरो आंदोलनात ज्योती येरेकार, अर्चना देवतळे, अनुसया थेरे, शीला देवतळे, मेघा तांबेकर, शेख मोबिया, अनिता विधाते, वैजयंती दुबारे प्रेमिला आस्वले यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सर्व सदस्या सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाला मनसे, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उबाठा गटाने जाहीर पाठिंबा घोषित केला. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, मनसेचे नेते राजू उंबरकर, इर्शाद खान, अनिस सलाट, लक्की सोमकुंवर, हिमांशू बोहरा, वंचितचे दिलीप भोयर, मंगल तेलंग आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

मुलाची 81 वर्षीय वृद्ध वडिलांना मारहाण

सावधान… ! वणी आणि परिसरात MLM/नेटवर्क बिजनेसचा सुळसुळाट

मंदिरात कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकेची पोत लंपास

Comments are closed.