कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी 7 एप्रिलपासून
अचानक खरेदी बंद केल्याने शेतक-यांमध्ये नाराजी
विवेक तोटेवार, वणी: वणी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे अचानक 2 एप्रिलपासून खरेदी बंद केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून माल आणलेल्या अनेक लोकांची यामुळे निराशा झाली व त्यांना आल्या पावली परत जावे लागले होते. शासनाने अती आवश्यक सेवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही खरेदी बंद असल्याने शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण होते.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला विचारणा केल्यावर त्यांनी सध्या आवक अधिक झाल्याने व सरकारी सुट्ट्या आल्याने खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ही खरेदी कोरोनाच्या संसर्गामुळे बंद केलेले नाही अशी माहिती दिली. 2100 क्विंटल आवक झाल्याने व मजूर वर्ग कमी कमी असल्याने खरेदी बंद केल्याची माहिती देण्यात आली.
मागील दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. कारण चना व तुरीची आवक अचानक वाढली होती. ज्यामध्ये 30 मार्चला 425 क्विंटल तर 31 मार्चला 2065 क्विंटल झाली. 31 मार्चला 30 मार्च रोजी आलेल्या मालाचे काटे करण्याचे काम सुरू होते. त्यातच मजूर वर्ग कमी असल्याने सध्या खरेदी बंद ठेवण्यात आली आहे.
जर अशा वेळी कुणी शेतकरी आपला माल घेऊन बाजारात आला असता त्याला परत करणार नाही त्याचा माल खरेदी करण्यात येईल. त्याच्या मालाचा हर्रस न झाल्यास त्याचा माल शेतकरी तारण योजनेत ठेवण्यात येऊन 75% रक्कम त्याला त्वरित देण्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती एपीएमसीचे सचिव अ. का. झाडे यांनी दिली.
सध्या तुरी 5200 तर चना 4180 भाव आहे. शासनाने अती आवश्यक सेवेत कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. यामागचे कारण म्हणजे शेतकऱ्याचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये हे आहे . त्यामुळे वणी बाजार समितीत 7 तारखेपासून खरेदी पूर्ववत सुरू होणार आहे. जय शेतकऱ्यांचे चुकारे अध्यापही मिळाले नाही ते त्यांच्या बँकेच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती ही झाडे यांच्याकडून देण्यात आली आहे.