कोरोनाच्या माहामारीत YES बँक बुडल्याचा फटका गरीब शेतकऱ्यांना

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हजारो खातेधारक शेतकरी सन्मान निधी पासून वंचित

0

जितेंद्र कोठारी, वणी: देशातील नामांकित बँक येस (YES) बँक बुडाल्याचा फटका यवतमाळ जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 94 शाखेतील 15 हजार खातेधारक शेतकऱ्यांना बसला असून लाभार्थी शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या पहिला हप्त्यापासून वंचित झाले आहे. इतर शेतकरी खातेदारांना याचा लाभ मिळाला असून ऐन कोरोनाच्या संकटाच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना मात्र यापासून वंचित राहावे लागले आहे.

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. 100 टक्के केंद्र शासन पुरस्कृत असलेली ही योजना राज्यात फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली. योजने अंतर्गत 2 हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात 3 टप्यात 2 हजार रु. प्रती टप्पा प्रमाणे 6000 रु. थेट (DBT) जमा करण्याची ही योजना आहे. या योजनेला राज्य मंत्रीमंडलाच्या दि. 04.02.2019 च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर योजनेची अंमलबजावणी दि. 01.12.2018 पासून ग्राह्य धरण्यात आली.

सदर योजने अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तब्बल 15 हजार शेतकऱ्याचीही लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे IFSC कोड YES बँकेशी संलग्न असून ऑनलाइन नोंदणी करताना IFSC कोड YESBOIDC034 हे टाकण्यात आले मात्र YES बँकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा लक्षात आल्यानंतर रिजर्व बँक ऑफ इंडियाने 5 मार्च 2019 रोजी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले.

YES बँक अडचणीत आल्यानंतर साहजिकच याचा परिणाम जिल्हा मध्यवर्ती बँकेवर झाला व बँकेने तडकाफडकी अक्सिस बँके सोबत करार करून त्यांच्याकडून नवीन IFSC कोड UTIB0SYDC04 मिळविला व नवीन व्यवहार सुरू केले. परंतु शेतकरी सन्मान निधी योजनेत ऑनलाइन टाकण्यात आले IFSC कोड संबंधित विभागाकडून बदलण्यात आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना Transaction failed चे मेसेज आले व नवीन वर्षात निधीचा एकही टप्पा मिळाला नाही.

सदर योजना योग्यरीत्या राबविण्या करिता राज्य स्तरीय प्रकल्प आढावा समिती, राज्य स्तरावर अमलबजावणी प्रमुख, विभागीय स्तरावर नोडल ऑफिसर, जिल्हा स्तरीय समिती, तालुका स्तरीय समिती व ग्राम स्तरीय समित्या नेमण्यात आली. तसेच आयुक्य (कृषि) यांचे नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पुणे येथुल संयुक्त खात्यातून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करण्यात येते. तरी सुद्दा एवढी मोठी चूक कोणाच्याही निदर्शनास आली नाही हे महत्वाचे.

सद्य स्थितीत सर्वसामान्यांसह शेतकरीसुद्दा कोरोना महामारी व लॉकडाउनच्या कचाट्यात सापडून आर्थिक हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत 2000 ची छोटीशी रक्कमचे महत्त्वदेखील त्याच्यासाठी मोठे आहे. प्रशासना व स्थानिक लोक प्रतिनिधीनी गरीब शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांच्या हक्काची व सन्मानाची रक्कम बँक खात्यात जमा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

काय म्हणतात बँकेचे वरीष्ठ अधिकारी?

यवतमाळ व वणी शाखेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 2 दिवसात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पैसे जमा होणार आहे. बँकेच्या 15 हजार लाभार्थी खातेधारकांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी 3.50 कोटी रु. प्राप्त झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अक्सिस बँकेचे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश असून येत्या काही दिवसात बँकेच्या उर्वरीत 92 शाखेचे IFSC कोड बदलून लाभार्त्यांच्या खात्यात रक्कम वळती करण्यात येईल.
– अरविंद देशपांडे, मुख्याधिकारी
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.