विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी दारूच्या 48 कॉर्टरसह दुचाकी जप्त करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असली तरी अद्यापही तिथे दारूविक्री सुरू न झाल्याने दारूची तस्करी सुरूच आहे. आज दिनांक 1 जुलै रोजी भद्रावती येथील शुभन संजय बावने (25) हा ऍक्टिव्हा या दुचाकीने (MH34 BM9567) दुपारी 12 वाजताच्या सुमारास वणीहून अहेरीमार्गे दारूची अवैधरित्या वाहतूक करीत होता. दरम्यान वणी-अहेरी (बोरगाव) रोड वर उकणी जवळ शिरपूर पोलिसांनी आरोपीला थांबवून त्याच्या दुचाकीची झ़डती घेतली असता त्याच्याकडे रॉयल स्टॅग या विदेशी दारुच्या 48 कॉर्टर आढळून आल्या. याबाबत त्याला विचारणा केली असता त्या अवैधरित्या भद्रावती येथे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी आरोपी शुभमला अटक करून त्याच्याकडून दारुच्या 48 कॉर्टर ज्याची किंमत 8640 व दुचाकी ज्याची किंमत 40 हजार रुपये असा एकूण 48,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ) (इ) नुसार गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात हेड कन्स्टेबल प्रमोद झुनूनकर आणि विनोद मोतेराव यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास व सदर दारू कुणाकडून आणली याचा तपास शिरपूर पोलीस सध्या करीत आहे.
हे देखील वाचा:
शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान