शासकीय आश्रमशाळेला शेतक-यानं दिलेली इमारत कोसळली
सात वर्षांपासून शेतक-याला मिळालं नाही इमारतीचं भाडं
ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मदनापूर येथील शासकीय आश्रमशाळेला भाड्यानं दिलेली इमारते कोसळली आहे. त्यामुळे शेतक-याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. यात शाळेच्या साहित्याचंही नुकसान झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतक-यानं ही इमारत भाड्यानं दिली आहे त्या शेतक-याला या इमारतीचं गेल्या 7 वर्षांपासून भाडं मिळालेलं नाही.
सविस्तर वृत्त असे की, मारेगाव तालुक्यात नरसाळा येथील शेतकरी महादेव खाडे यांची मदनापूर येथे शेती आणि इमारत आहे. 2004 साली खाडे यांनी सदर इमारत शासकीय आश्रमशाळेला दरमहा 2 हजार 300 रुपयानं भाड्यानं दिली होती. 2010 पर्यंत इमारतीचं भाडं नियमित दिलं गेलं, पण त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यानं मदनापूर शाळा बंद करून बोटोणी येथे स्थलांतरीत करण्यात आली.
स्थलांतरानंतर प्रशासनानं शेाळेतील साहित्य इमारतीमध्येच ठेवले त्यामुळे सदर इमारत ही शासकीय आश्रमशाळेच्या ताब्यात होती. परिणामी महादेव खाडे यांचा मुलगा प्रभाकर खाडे यांनी संबधीत विभागाकडे वेळोवेळी भाड्यासाठी पायपिट केली. गेल्या दोन दिवसापासून मारेगाव तालुक्यात संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसानं सदर इमारत भूईसपाट झाली.
(चिखलगाव जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत)
इमारत शासकीय यंत्रणेच्या ताब्यात असल्यानं इमारतीमध्ये असलेल्या साहित्य प्रभाकर खाडे यांना बाहेरही काढता येत नव्हतं, तसंच ती इमारत रिमामीही करून घेता येत नव्हती. या इमारतीचं नुकसान शासनाच्या ताब्यात असताना झालं आहे त्यामुळे तहसिलदारांना निवेदन दिलं आहे. त्यांचं जे काही आर्थिक नुकसान झालं आहे त्याची भरपाई द्यावी अशी मागणी प्रभाकर खाडे यांनी केली आहे.