महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

प्रियकर-प्रेयसीच्या कुटुंबीयांमध्ये झाला होता पोलीस ठाण्याच्या आवारातच वाद

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनच्या आवारातच एका महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर पोन्नलवार (46) व योगिता पोन्नलवार (39) या दोघांसह एका विधीसंघर्ष (अल्पवयीन) मुलीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की वणीतील तेली फैल परिसरात राहणा-या एक मुलीचे एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र या नात्याला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या दिवशी ते दोघेही घरून पळून गेले. त्यांनी बाहेरगावी जाऊन लग्न केले. प्रकरण शांत झाल्याचे वाटल्यावर हे जोडपे वणीत परत आले. परत आल्याची माहिती देण्यासाठी व सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

प्रियकर प्रेयसी वणीत परत आली असून ती पोलीस ठाण्यात असल्याची माहिती दोन्ही कुटुंबीयांना मिळाली. त्यावरून दोन्ही कुटुंब पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे दोन कुटुंबात वाद सुरू झाला. दरम्यान वाद वाढत असल्याचे पाहून पोलीस ठाण्यात कार्यरत छाया उमरे यांनी दोन्ही कुटुंबांना कार्यालय परिसरात वाद घालू नका अशी दोन्ही कुटुंबांना विनंती केली.

मात्र चिडलेल्या एका महिलेने छाया उमरे यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत त्या खाली पडल्या. या प्रकरणी पोलिसांनी कर्मचा-याच्या तक्रारीवरून एक महिला, एक पुरुष व एका विधीसंघर्ष (अल्पवयीन) मुलीला ताब्यात घेतले आहे. भर पोलीस ठाण्यातच एका महिला कर्मचा-याच्या अंगावर धावून गेल्याने संताप व्यक्त केला जात होता.

हे देखील वाचा: 

Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

Comments are closed.