विवेक तोटेवार, वणी: व्यावसायिक कारणावरून वणीत दोन भाऊ आपल्या भावावरच उठलेत. भावांनी मिळून आपल्या सख्या भावावर लोखंडी सळाखीने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमीच्या पत्नीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास कोंडावार ले आऊट येथे घडली.
अंकुश दिगंबर पाते (40) आणि धीरज दिगंबर पाते रा. कोंडावार ले आऊट वणी अशी हल्ला करणाऱ्या भावांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी अंकुश हा नरेश दिगंबर पाते यांच्या घरी आला. आमच्या रेतीच्या व्यवसायाची माहिती प्रशासनाला का देतो. अशी विचारणा करीत लोखंडी सळाखीने नरेश याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नरेशच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
यानंतर धीरज पाते यांनी नरेशला लाथाबुक्कींनी मारहाण केली. अशाप्रकारची तक्रार जखमी नरेश पाते यांच्या पत्नीने मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी वणी पोलिसात दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अंकुश व धीरज यांच्याविरुद्ध कलम 324 (34) भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेत धीरज यांच्या म्हणण्यानुसार नरेश याने दारूच्या नशेत धीरज व त्याच्या भाऊ अंकुश यांची दुचाकीची तोडफोड केली. यावरून अंकुश व नरेश यांच्यात वाद झाला. घटनेच्या वेळी धीरज हे शिरपूरला असल्याचे सांगत होते. याबाबत वणी पोलिसात धीरज यांनीसुद्धा तक्रार दिली आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.कॉ. दिगंबर किनाके व दिलीप जाधव करीत आहे
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)