पिवरडोल येथे तरुणावर हल्ला करणारा नरभक्षक वाघ जेरबंद
दुपारी रेस्क्यू टीमची कार्यवाही, रविवारपासून सुरू होते सर्च ऑपरेशन
सुशील ओझा, झरी: शुक्रवारी दिनांक 9 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला होता. शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान अविनाशवर हल्ला करणा-या वाघाला वनविभागाने जेरबंद केल्याची माहिती प्राप्त होत आहे. पिवरडोल परिसरातच आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास वाघाला जेरबंद करण्यात आल्याची माहिती आहे. चार दिवसात वाघाला जेरबंद करण्याचे तसेच इतर काही लिखित आश्वासने वनविभागाने गावकरी व अविनाशच्या कुटुंबीयांना दिले होते.
शनिवारी रात्री आश्वासने दिल्यानंतर रविवारपासूनच कार्यवाहीला सुरुवात झाली. यासाठी बुलढाणा, अमरावती व नागपूर येथील रेस्क्यू टीम बोलवण्यात आली होती. दुस-याच दिवशी रेस्क्यू टीमने कारवाई फत्ते करत नरभक्षक वाघाला जेरबंद केले. हल्ला करणारा रंगिला हा वाघ आज दुपारी पिवरडोल परिसरात असल्याची माहिती रेस्क्यू टीमला मिळाली. त्यावरून रेस्क्यू टीम वाघाला पकडण्याच्या तयारीत होती. दुपारी पिवरडोल गावापासून 1 किमी अंतरावर असलेल्या कांचन वाढगुरे यांच्या शेताजवळ रंगिला आढळून आला. रेस्क्यू टीमने योग्य संधी मिळताच वाघाला जेरबंद केले.
सध्या रेस्क्यू टीम पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करीत आहे. वाघाला ट्रकवरील पिंज-यात ठेवण्यात आले आहे. जेरबंद केलेल्या वाघाला आधी पांढरकवडा येथे व तिथून नागपूरला पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान वाघाला जेरबंद केल्याची माहिती मिळताच आजही परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. व्हिडीओ काढण्यासाठी लोकांची एकच लगबग सुरू होती. वाघाला ट्रॅक्टरवरून घेऊन जाताना नागरिकांनीही दुचाकीने गाडीचा पाठलाग केला.
(अधिक माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)
वाघाला पाहण्यासाठी आजही बघ्यांनी एकच गर्दी केली होती….
काय आहे ही घटना?
पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने हल्ला करीत त्याच्या मृतदेहाची चाळणी केली होती. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. वाघ घटनास्थळीच शिकार खात उभा होता. हा थरार बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सुमारे 2 ते 3 हजारांची गर्दी याठिकाणी गोळा झाली होती.
वाघाला पाहण्यासाठी व व्हिडीओ शुटिंग करण्यासाठी बघ्यांची एकच झुंबड उडाली होती. अखेर 4 तासानंतर सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांना वाघाला हुसकावण्यात यश आले. दरम्यान वाघ तीन ते चार तास शिकार खात असताना वाघाला हुसकावण्यात का आले नाही? असा सवाल करत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका अविनाशचे कुटुंबीय व गावक-यांनी घेतली होती.
त्यानुसार हल्ला करणा-या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी (रेस्क्यू) चार दिवसात प्रस्ताव सादर केला जाईल असे आश्वासन वनविभागाने दिले होते. यासह मृत व्यक्तीच्या बहिणीस आठ दिवसात अस्थायी नोकरी देण्यात येईल. वाघाच्या नियंत्रणाकरीता ग्रामस्थांचा दल बनवण्यात येईल. वन विभागाच्या जागा निघताच त्यात मृतकाच्या बहिणीला प्राधान्य देण्यात येईल. संवेदशशील भागात जंगलाच्या कडेला तारांचे कुंपण केले जाईल, शासनाच्या नियमानुसार त्वरित सानग्रह मदत दिली जाईल. वाघाचा धोका असलेल्या भागात वनकर्मचारी व वनमजूर यांची संयुक्त ड्युटी लावण्यात येईल. इत्यादी आश्वासनेही दिले होते.
मांडवी परिसरात वाघाचा मुक्त संचार
पिवरडोलपासून दोन किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे. या गावालगतच्या शेतशिवारात बिजली या वाघिणीचा तिच्या बछड्यासह होता. बिजलीचाच बछडा रंगिला व नुरा यांचा देखील याच परिसरात मुक्त संचार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. आज झालेल्या कारवाईत रेस्क्यू टीमने रंगिलाला जेरबंद केले आहे.
हे देखील वाचा:
मानवतेला काळीमा ! शौचास गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार
आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण