अवैद्य दारूविक्री विरोधात निवेदन दिले म्हणून मारहाण केल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत अनिल गेडाम यांनी मांडली बाजू
नागेश रायपुरे, मारेगाव : शहरातील प्रभाग क्र 13 मध्ये अवैध दारु विक्री सुरू होती. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनिल गेडाम यांनी दरम्यान मारेगाव पोलीस स्टेशन भेट देण्यासाठी आलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले. या कारणावरूनच गेडाम आणि त्यांच्या पत्नीला घरात घुसून अवैध दारूविक्रेत्यांनी मारहाण केल्याचा आरोप स्थानिक विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल गेडाम यांनी केला.
दारूविक्रीमुळे प्रभागात होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनिल गेंडाम यांनी पुढाकार घेऊन नागरीकांच्या स्वाक्षरींसह मारेगाव पोलीस स्टेशन येथे भेटी दरम्यान आलेल्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना निवेदन दिलें. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या पथकाने व मारेगाव पोलिसांनी प्रभागात धाड टाकली असता सदर अवैध दारू व्यावसायिकांच्या घरातून देशीदारू जप्त करून कारवाई केली.
त्यावरून प्रभागातीलच अवैध दारू विक्रेत्यांनी तक्रारकर्ता अनिल गेडाम यांना व त्यांचे पत्नीला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी दोन्ही गटांवर मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल गेडाम यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या अवैध दारूव्यावसायिकावर कारवाई न झाल्यास पोलीस स्टेशनसमोर परिवारासह उपोषणास बसण्याचा इशारा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.