बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘आविष्कार 2025’ स्पर्धेत लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांनी जिल्हास्तरीय फेरीत कमाल केली! यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी संस्थेत आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण ६ पारितोषिके जिंकली. पोस्टग्रॅज्युएट, अंडरग्रॅज्युएट आणि विविध कॅटेगरींमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी महाविद्यालयाचा झेंडा आल्हाददायकपणे फडकावला. या यशाने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला नवे बळ मिळाले असून, आता विद्यापीठ स्तरावरही त्यांचा सहभाग निश्चित झाला आहे.
पोस्ट पदव्युत्तर स्तरावरील ह्यूमनिटीज, लँग्वेज अँड फाइन आर्ट्स या गटात हेमंत मालेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अंडर ग्रॅज्युएट स्तरावरील प्युअर सायन्स गटात पूजा बांदूरकर व देवेन पारखी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी गटात लौतिका देठे व मंजुला चिकनकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मेडिसिन अँड फार्मा गटात देवेन पारखी व विनीत पोयाम यांनी प्रथम क्रमांक तर कुमकुम झाडे व तूबा अली खान यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ गटात सुशील यादव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतींमध्ये पर्यावरणपूरक झाडांच्या कुंड्या, शोभेच्या वस्तू, आंधळ्यांसाठी सिग्नल देणारी काठी, सोलर प्लेट ऑटोमॅटिक साफ करण्याचे तंत्र, शेतीतील वेस्ट मटेरियलपासून तयार केलेले बायो एन्झाईम व त्यापासून नैसर्गिक शाम्पू, साबण, हॅन्डवॉश, केळीच्या सालीपासून पाऊच बनविण्याचे तंत्र अशा नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. तसेच आरोग्यावर परिणाम करणाऱ्या लहरींपासून बचाव करणारा सेफ्टी पॉकेट बॉक्स, आरोग्यविषयक माहिती साठवणारे ऑनलाइन अॅप्लिकेशन व मार्केटिंगसंबंधी प्रतिकृतीही सादर करण्यात आल्या.
संशोधन वृत्तीला चालना, हाच कॉलेजचा प्रयत्न
मागील पाच वर्षांपासून आम्ही मा. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आविष्कार या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करीत आहो. मागील दोन वर्षांपासून लो. टि. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर केलेले आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या चिकित्सक व संशोधन वृत्तीला चालना मिळण्यास मदत होते तसेच काहीतरी नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करून त्या प्रणालीचा समाजासाठी कसा फायदा करून घेता येईल ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होते. – डॉ. अजय वि. राजूरकर कॉलेज समन्वयक, आविष्कार सेल, लो. टि. महाविद्यालय वणी

या यशामध्ये प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, समन्वयक डॉ. अजय राजूरकर, मार्गदर्शक डॉ. आदित्य शेंडे व डॉ. संघदीप उके यांचे योगदान लाभले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मते यांच्यासह तांत्रिक सहकार्य करणारे मनोज सरमोकदम व मनीष पेटकर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून विद्यापीठ स्तरावरही यश मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या.


Comments are closed.