वणीच्या ऐतिहासिक बैलबाजाराला घरघर

0

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या रंगनाथ स्वामीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हात भरणारी ही सर्वात मोठी जत्रा आहे. ही जत्रा केवळ विदर्भातच नाही तर राज्याबाहेरही प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथं भरणा-या बैलबाजारामुळे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला बैलबाजार वणीत भरला आहे. मात्र सततची नापिकी, बोंडअळीचा प्रादुर्भाव, शेतमालाला मिळालेला अत्यल्प दर यामुळे शेतक-यांजवळ पैसाआडका नसल्याने याचा मोठा फटका बैलबाजाराला बसला आहे.

वणीतील बैलबाजार प्रसिद्ध असल्याने कधीकाळी केवळ राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही बैलाच्या खरेदी विक्रीसाठी येथे मोठ्या संख्येने लोक येत. यावर्षी परराज्यातून येणा-या बैलांची संख्या कमी असली तरी राज्याभरातून मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी आणण्यात आले आहे. मात्र हा बाजार सध्या खरीददारांच्या प्रतीक्षेत आहे. वणीच्या बाजारात 40 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या बैलजोड्या उपलब्ध आहेत. मात्र शेतक-यांजवळ पैसे नसल्याने बैलजोडीला भाव मिळत नसल्याचे इथले विक्रेते सांगत आहेत. अनेक शेतक-यांनी चार पैसे कमवण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी बैलजोडी विकत घेतली आहे. त्यावर थोडा नफा मिळवत ती वणीच्या बाजारात विकायची या उद्देशाने त्यांनी बैलजोडी विक्रीसाठी वणीच्या बाजारात आणली आहे. पाण्याचा खर्च, चा-याचा खर्च वाढला आहे. यामुळे बैलांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. मात्र बाजारात बैलजोडीला अत्यल्प भाव असल्याने अनेक शेतक-यांचे बैल दावणीलाच बांधलेले आहेत.

बैलबाजारासाठी नगर पालिकेने जागा दिली आहे. त्यासाठी प्रत्येकाकडून 25 रुपयांची पावती फाडण्यात आली आहे. मात्र या सुप्रसिद्ध बैलबाजारासाठी आवश्यक ती सेवा देण्यात नगर पालिके सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीही सपशेल अपयशी ठरली आहे. बैलबाजार भरतो त्या जागेत पुरेशा लाईटची व्यवस्था नाही. सध्या सर्वत्र पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वणी देखील त्याला अपवाद राहिलेली नाही. या पाण्याचा फटका देखील बैलबाजारातील विक्रेत्यांना बसला आहे. या सुप्रसिद्ध बाजारात ना जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना विक्रेत्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. विक्रेते जनावरांसाठी आणि स्वतःसाठी पाणी विकत घेत आहे. एका ड्रमसाठी वीस ते तीस रुपये त्यांना मोजावे लागत आहे. सोबतच चा-याचा खर्चही आहेच. मात्र ग्राहक नसल्याने चा-याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अपेक्षीत भाव न मिळाल्याने बैल तसेच दावणीला बांधलेले आहे. आधीच बैलाचा खरीददार नाही. त्यातच वाढत जाणारा खर्च यामुळे किमान पुरेशी लाईट आणि पाण्याची व्यवस्था तरी प्रशासनानं करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ आणि सततच्या नापिकीला शेतकरी कंटाळला आहे. त्यातच शेतमालाला अत्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतीचा व्यवसाय शेतक-यांना तोट्याचा ठरत आहे. सततच्या नापिकीला कंटाळून यापुढे शेती करायची नाही असं ठरवून एक शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन वणीच्या बैलबाजारात विक्रीसाठी आला आहे. शेती न करण्याचा निर्णय घेतल्याने बैलजोडी विकायला काढली आहे. बैलजोडीची किंमत सव्वा लाख रुपये ठेवली आहे. मात्र त्यापेक्षा कमी भावात बैल मागत असल्याने बैलजोडीची विक्री झाली नाही अशी खंतही त्याने व्यक्त केली.

तथाकथिक गोरक्षकांचा उन्माद याचा देखील बैलबाजारावर प्रतिकुल परिणाम झाला आहे. तथाकथित गोरक्षकांच्या धाकाने अनेकांनी बैल वणीच्या बाजारात आणले नाही. अन्यथा परराज्यातून येणा-या बैलांचं प्रमाण इथे मोठ्या प्रमाणात असायचं. यावेळी मोजके लोक विक्रीसाठी परराज्यातून आले आहे. बैल जेव्हा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणावर नेला जातो. तेव्हा तथाकथित गोरक्षक पकडतात. दाखला दाखवल्यावरही ते त्रास देतात. बैल पोलीस ठाण्यात घेऊन जातात. तिथे पैशाची मागणी केली जाते. पैसे दिले की बैल सोडतात. असा आरोप करत बैल आणायला परवडत नाही अशी आपबिती एका शेतक-याने बोलून दाखवली.

बैलबाजाराच्या प्रवेशद्वारापासून बैलांच्या सजावटीचे सामान विकायला आहे. धामनगाव, अमरावती इत्यादी भागातून बैलांच्या सजावटीचे सामान विकण्यासाठी विक्रेते आले आहेत. सजावटीचे सामान विक्रेते म्हणाले की बैल विकला गेला की त्याच्या सजावटीचे सामानही विकत घेतले जाते. मात्र यावर्षी बैलांची विक्री कमी आहे. त्यामुळे सजावटीच्या सामानाच्या विक्रीत देखील घट आली आहे. गेल्या 40 वर्षांपासून इथे सजावटीचे सामान विक्रीसाठी आणत आहे. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारची मंदी असल्याचे विक्रेत्यांनी बोलून दाखवले.

वणीच्या बैलबाजाराला एक विशिष्ट अशी ओळख आहे. वणीच्या जत्रेचं प्रमुख आकर्षण हे बैलबाजार आहे. सध्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये वाढ झाली आहे. टीव्ही, स्मार्टफोन यात लोक मनोरंजन शोधत असल्याने गेल्या काही वर्षांपासून जत्रेत आकर्षण काही प्रमाणात कमी होत आहे. पण बैलबाजाराची प्रसिद्धी आणि महत्त्व यात तसूभरही कमतरता आलेली नाही. आजही मोठ्या प्रमाणात चार पैसे कमवण्यासाठी इथे बैल विक्रीसाठी आणले जातात. मात्र शेतमालाला मिळालेला अत्यल्प दर, प्रशासनानं दिलेल्या अपु-या सोयीसुविधा यामुळे भविष्यात या राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या बैलबाजाराचं महत्त्व कमी होतय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपालिका, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी बैल बाजारात किमान पाण्याची तरी व्यवस्था केली, तरीआधीच हवालदिल झालेल्या शेतक-यांच्या जखमेवर थोडी का होईन फुंकर होईल अशी अपेक्षा विक्रेते करीत आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा हा एक्सक्ल्युझिव व्हिडीओ रिपोर्ट…

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.