“अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व राखले वाघाने”
चंद्रपुरात केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिरांना केले धानोरकरांनी धोबीपछाड !
विलास ताजने, वणी : अख्या देशात भाजपची विजयी घोडदौड सुरू असताना मात्र ‘चंद्रपूर वणी आर्णी’ मतदारसंघाची जागा काँग्रेसने खेचून आणली. नव्हे तर अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व वाघाने राखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धानोरकरांनी हा विजय प्राप्त करतांना देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असणाऱ्या देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना अक्षरशः धोबीपछाड केले. अन अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
काँग्रेसची उमेदवारी बहाल करण्यापासूनच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र सुरेश धानोरकरांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यात उत्साह संचारला होता. सदर मतदार संघात भाजपचे पाच आमदार आहेत. तर शिवसेनेचे सुरेश धानोरकर हे एकमेव आमदार होते. बहुतांश ग्रामपंचायत पासून तर सर्व स्तरावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित आहे.
अशावेळी ही निवडणूक निश्चितच धानोरकरांसाठी अवघड होती. मात्र लोकसभा मतदार संघात फोफावलेले अवैध धंदे, बेरोजगारी, दोन दशके संधी मिळूनही मतदारसंघात ठोस कामाचा अभाव यांसह अन्य बाबींचा फटका अहीर यांना बसण्याची शक्यता मतदारांत चर्चिल्या जात होती. तर काँग्रेसला बाळु धानोरकरांच्या रुपात मिळालेला रुबाबदार, तडफदार युवा चेहरा जो तरुणांनाच नव्हे तर वृध्दांनाही भावणारा ठरला. शिवाय सर्व समाज बांधवांसह कुणबी समाजाची एकगठ्ठा मिळालेली मते, वणी तालुक्यातील परमडोह (शिंदोला) ही धानोरकरांची सासुरवाडी (सुरेश पाटील काकडे ) यामुळे काँग्रेसचा उमेदवार म्हणजे आपला जावई, अन भाजप- शिवसेना यांच्यातील संभाव्य युती न होण्याची शक्यता यामुळे धानोरकरांनी खासदारकी लढवायचा जणू चंगच बांधला होता. त्यानिमित्ताने सर्व विधानसभा मतदारसंघात वाढवलेला जनसंपर्क, कामाचा पाठपुरावा करणे आदि बाबी धानोरकरांसाठी जमेच्या होत्या.
धानोरकरांना पराभूत करण्यासाठी राबविलेले दूधवाला की दारुवाला ? कॅम्पेन असो किंवा त्यांच्या चंद्रपूर येथील घरावर आयकर विभागाने टाकलेली धाड असो या बाबी सामान्य लोकांच्या मनात चिड निर्माण करणाऱ्या ठरल्या. एकूणच सुरेश धानोरकरांसाठी ही लढाई आर या पार ची होती. कदाचित धानोरकर हरले असते तर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली असती. मात्र धानोरकरांचा आत्मविश्वास सार्थकी लागला. भविष्यात देखील राजकीय पटलावर सुरेश धानोरकर विरुद्ध हंसराज अहीर यांच्या या लढतीचे नाव चर्चिल्या जाईल एवढे मात्र निश्चित !