परमडोह, चिखली, टाकळी गावांना वादळी पावसाचा फटका

परमडोहच्या जिल्हा परिषद शाळेचे छत उडाले, अनेक घरांचे नुकसान

0 406

विलास ताजने, वणी: सोमवारी सायंकाळी शिंदोला परिसरातील परमडोह, चिखली ,टाकळी गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून पडझड झाली. झाडे उन्मळून पडली. खांब वाकले, वीजेच्या तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला. मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही.

वणी तालुक्यातील पैनगंगा किनाऱ्यावरील परमडोह, टाकळी, चिखली या गावशिवारात सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यावर पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. नागरीकांनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील छत पूर्णपणे उडाले. त्यामुळे शाळेतील डिजिटल खोल्यांमधील साहित्याचे नुकसान झाले. २६ जून पासून शाळांना प्रारंभ होत आहे. त्यामुळे सदर शाळेची डागडुजी त्वरित होणे गरजेचे आहे.

Comments
Loading...