ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीवर गुन्हे दाखल

मागितला शाळेला शिक्षक, दाखल केले गुन्हे...

0

वणी: ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीनं शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले होते. परिणामी गटविकास अधिकारी यांनी शाळेला शिक्षक न देता थेट शाळा व्यवस्थापन समितीची पोलीसात तक्रार केली आहे. मात्र या शाळेत शिक्षकांची कमतरता असताना नुकत्याच झालेल्या समायोजनात एकही शिक्षक या शाळेत दिला गेला नाही हे विशेष.

वेळाबाई केंद्रांतर्गत ढाकोरी ही जिल्हा परिषदेची शाळा येते. इथल्या वर्ग 1 ते 5 मध्ये 45 विद्यार्थी आहेत. तर 6 ते 8 या वर्गात 45 विद्यार्थी आहे. वर्ग 1 ते 5 ला शिकविण्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक आहे, तर 6 ते 8 वर्गासाठी केवळ एकच शिक्षक आहे. त्यातच शिक्षकांकडे मतदार यादीची कामे, मुख्याध्यापकाची कामे अशी अनेक कामं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे.

नुकत्याच झालेल्या समायोजनात ढाकोरी येथे एकाही शिक्षकाचे समायोजन शिक्षण विभागानं केलेलं नाही. याउलट तालुक्यातील तीन शिक्षक इतर तालुक्यात हलविण्यात आले. ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पंचायत समितीला शिक्षक देण्यासंबधीचे निवेदन सादर केलं. पण पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केलं अखेर पालकांनी 65 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गटविकास अधिका-यांच्याच कक्षात शाळा भरवून आंदोलन केलं.

गटविकास अधिकारी यांनी येत्या 10 तारखेपर्यंत शिक्षकांचे निर्धारन करण्याचे आश्वासन संबधीतांना दिले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीने माघार घेतली होती. मात्र पंचायत समितीने आपल्यावरचे खापर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांवर फोडत कोणतीही पुर्वसूचना न देता गटविकास अधिकारी राजेश गायनार यांनी गटशिक्षणाधिकारी यांना सूचना करून शाळा व्यवस्थापन समिती ढाकोरी विरूध्द तक्रार द्यायला लावली.

(‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट… दोन गुरू, एक चेला बातमीची प्रशासनाकडून दखल)

याप्रकरणी भास्कर वासेकर, रामकिसन येरगुडे व इतरांविरूध्द पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. एकूणच शिक्षकाची मागणी करीत गटविकास अधिकारी यांचे कक्षात शाळा भरविणे ग्रामस्थांना महागात पडले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.