काँग्रेसचे एक मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर
महामंडळाचे आश्वासन ! आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का
बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसचा एक मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वाटेवर असल्याची खात्रीशीर माहिती आहे. सदर नेत्याची वणी विधानसभेत धडाडीचा नेता अशी ओळख असून त्यांना महामंडळाचे पक्षश्रेष्ठींनी आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. हा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामाला सर्वच पक्ष लागले आहे. डॉ. महेंद्र लोढा यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला कुणी वाली उरला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम थांबले होते. मात्र आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब करमरकर व वणी विधानसभा प्रमुख आशिष मोहीतकर यांनी पुढाकार घेतला. यात त्यांना यश देखील आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
वणीला लागणार महामंडळाची लॉटरी?
दरम्यान नुकतीच त्यांची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनात लढल्या जाण्याचे व त्यासोबत महामंडळावर वर्णी लावण्याचे आश्वासन त्यांना मिळाल्याची देखील सूत्रांकडून माहिती आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने सदर नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘वेट ऍन्ड वॉच’ अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसच्या या नेत्याने विधानसभेच्या तिकीटासाठी प्रयत्न केले होते. मात्र तिकीट मिळवण्यात त्यांना अपयश आले. त्यांचे एक ‘मित्र’ राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे. त्यांनी देखील या नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास आगामी निवडणूक त्यांच्याच मार्गदर्शनात लढली जाणार आहे. यामुळे निवडणुकीला चांगलाच रंग भरला जाणार असून निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्ह आहेत. सध्या या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Comments are closed.