रात्री चक्कर आल्याने घेतला बस स्थानकात आसरा, दुचाकीवर चोरट्याचा डल्ला

दुचाकी चोरट्यांच्या रडारवर, बस स्थानकावरील सलग दुसरी घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील बस स्थानकावरून दुचाकी चोरीला गेली. यात दुचाकी ठेवणा-या शेतक-याचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकावरून दुचाकी चोरी होण्याची ही गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.  

सुधीर अरुण निखाडे (33) हे चिखलगाव येथील रहिवासी असून ते शेती करतात. त्यांनी 2016 मध्ये ऍक्टिव्हा ही मोपेड (MH29 AV2585) विकत घेतली होती. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ते शेतातून घराकडे येत असताना त्यांना अचानक चक्कर आल्यासारखे वाटले. त्यामुळे ते बस स्थानक परिसरात गेले. तिथे त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर त्यांची दुचाकी लावली व ते प्लॅटफॉर्म समोर असलेल्या प्रवाशांसाठी बसणा-या ओट्यावर जाऊन झोपले.

पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी बघितले असता त्या ठिकाणी त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली. 

 

अलिकडच्या काळातील दुसरी घटना
दोन महिन्याआधी अशाच प्रकारे दुचाकी चोरीची घटना बस स्थानकात घडली होती. वेकोलितील एक कर्मचारी रात्री उशिरा ड्युटीवरून परत येताना बरे वाटत नसल्याने बस स्थानकावर आराम करण्यास गेले होते. त्यांनी सकाळी उठून पाहिले असता त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे कळले होते. शहरातील घरफोडीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये कोणतीही कमी आलेली नाही. अनेक घरी पार्किंग किंवा गाडी ठेवण्याची जागा नसते. अशा वेळी ते अनेक वर्षांपासून दुचाकी घराबाहेर लॉक करून ठेवतात. अनेक लोक रात्री घराबाहेर दुचाकी लावतात. अशा दुचाकी चोरट्यांच्या रडारवर असून चोरटे दुचाकी लंपास करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

या प्रकरणी वणी पोलिसांनी भादंविच्या कलम 379 नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. वणीतील सुरू असलेले दुचाकीचोरींचे सत्र कधी थांबणार असा? सवाल वणीकर उपस्थित करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.