भाजप शहर अध्यक्षांच्या ‘त्या’ पोस्टची शहरभर चर्चा!
भाजपमध्ये सर्व काही आलबेल की आतमध्ये काहीतरी खदखद?
निकेश जिलठे, वणी: नगरपालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. विधानसभेच्या पराभवानंतर पक्षात आलेलं साचलेपण दुर करून भाजपला ‘बुस्ट’ देणारा हा विजय ठरला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात मिळालेल्या विजयाची चहू बाजूंनी चर्चा झाली, विश्लेषण झाले. दरम्यान या घडामोडीत एका नावाने लक्ष वेधून घेतले. ते नाव म्हणजे अॅड नीलेश चोधरी ! एक कुशल रणनितीकार म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे नियोजनही त्यांच्याकडेच राहणार असे बोलले जात आहे. दरम्यान त्यांची फेसबूकवरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
राजकीय नसलेली पोस्ट… पण राजकीय अर्थ?
चार दिवसांपूर्वी अॅड. नीलेश चौधरी यांनी फेसबुकवर एक भावनिक, तत्त्वचिंतनात्मक पोस्ट लिहिली. जरी ती त्यांनी संस्था अध्यक्ष म्हणून लिहिली असली आणि यात कुठेही राजकारणाचा उल्लेख नसला, तरी ती पोस्ट सध्या राजकीय चष्म्यातून पाहिली जात आहे.
काय आहे पोस्ट?
कधीकधी शांतता ही पळ काढणं नसत ती स्वतःला परत शोधण्याची सर्वात प्रौढ, सर्वात खोल प्रक्रिया असते.
काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधतो, शोधत राहतो, कुणालाही विचारतो, पण एक क्षण येतो जिथे त्या प्रश्नांना “शब्द” नाही मिळत आणि मन थकून बसते. तेव्हा शांतता हवी असते. गोंधळातून, आठवणींमधून, अपेक्षांच्या ओझ्यातून, लोकांच्या आवाजातून थोड्या वेळासाठी बाहेर पडण्यासाठी. स्वतःला पुन्हा ऐकण्यासाठी, स्वतःचा ठोका पुन्हा जाणून घेण्यासाठी. शांतता माणसाला कमकुवत करत नाही ती माणसाला पुन्हा बांधते, पुन्हा आकार देते, पुन्हा जीवंत करते. उत्तर नसलेल्या प्रश्नांपासून जेव्हा आपण एक पाऊल मागे घेतो, तेव्हा जीवन पुन्हा प्रश्न देत नाही. ते आपल्याला स्वतःशी संवाद करायला लावते. तेव्हा कळतं उत्तरांपेक्षा मौन जास्त शिकवतं, आणि शांततेतूनच नवीन अर्थ जन्माला येतात.
– ॲड. निलेश माया महादेव चौधरी,
अघ्यक्ष, रॉयल फाउंडेशन वणी
सदर पोस्टमध्ये शांतता म्हणजे पळ काढणं नसतं किंवा उत्तर नसलेल्या प्रश्नांपासून एक पाऊल मागे घेतो किंवा मग मौन जास्त शिकवतं असा उल्लेख आहे. नुकत्याच मिळालेल्या यशानंतर, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आलेली ही काहीशी नैराश्याची किनार असलेली पोस्ट नेमकी काय सूचित करते, याचे डिकोडिंग राजकीय वर्तुळात सुरू आहे. जो तो आपापल्या परीने त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
लवकरच नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आहे. तसेच स्वीकृत नगरसेवकांची पक्षांतर्गत निवड प्रक्रिया सुरू आहे. त्या दरम्यान ही पोस्ट आल्याने त्याकडे राजकीय अँगलने बघितले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे की आत काही खदखद आहे, याची देखील याच निमित्ताने चर्चा होत आहे.
पदग्रहण सोहळ्याच्या पत्रिकेत नाव गहाळ
12 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या नगरसेवकांचा व नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आहे. या सोहळ्यात भाजपचे अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. सोहळ्याच्या पत्रिकेत आयोजक म्हणून वणी शहर भाजप असे लिहिले आहे. मात्र यात शहर अध्यक्ष या नात्याने अॅड नीलेश चौधरी यांचे नाव नाही. त्या ऐवजी शहर भाजप, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते असा उल्लेख आहे. ही पत्रिका अनेक भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपल्या स्टेटसवर शेअर केली आहे. मात्र या पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने या पत्रिकेची देखील सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

अवघ्या 4 महिन्याआधी नीलेश चौधरी यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला. राजकारणाची पाटी कोरी असतानाही त्यांची थेट शहर प्रमुख पदी निवड झाली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवत चौधरी यांनी पक्षात अनेक नवीन लोक जोडलेत. शहर अध्यक्ष म्हणून त्यांच्या नियोजनात भाजपने नगरपालिका निवडणूक लढवली. त्यात भाजपला दणदणीत यश मिळाले. अल्पावधीतच कुशल रणनितीकार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आले. ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. मात्र याच यशाच्या टप्प्यावर आलेली ही पोस्ट, आणि त्यासोबत मनात निर्माण झालेली ‘शांत’ किंवा ‘मौन’ चर्चा, यामुळे “भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे की आणखी काही” हा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकारणात शब्द कधी कधी कृतीपेक्षा अधिक बोलके असतात. अॅड. नीलेश चौधरी यांची पोस्ट ही केवळ वैचारिक शांततेची अभिव्यक्ती आहे, की अंतर्गत घडामोडींचा सूचक इशारा—हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र एवढे निश्चित की, एका पोस्टने शहराच्या राजकारणात निर्माण केलेली ही चर्चा, भाजपमधील अंतर्गत हालचालींकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. शांततेतून जन्माला येणारे अर्थ, कधी कधी मोठे राजकीय वळण घेऊ शकतात… आणि वणीचे राजकारण सध्या याच वळणावर उभे आहे का?



Comments are closed.